येमेनमध्ये आत्मघाती हल्ला; १५ विद्यार्थ्यांसह २५ ठार
By admin | Published: December 17, 2014 01:18 AM2014-12-17T01:18:27+5:302014-12-17T01:18:27+5:30
शिया नेत्याला ठार मारण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्यात १५ शाळकरी विद्यार्थ्यांसह २५ जण ठार झाले.
सन्ना : शिया नेत्याला ठार मारण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या आत्मघाती कारबॉम्ब हल्ल्यात १५ शाळकरी विद्यार्थ्यांसह २५ जण ठार झाले.
स्थानिक सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संशयित अल कायदा अतिरेक्यांनी राडा गावात शिया नेत्याच्या घरावर हा हल्ला केला.
या हल्ल्यात शाळकरी विद्यार्थ्यांची बस सापडली. गेल्या सप्टेंबर महिन्यात राजधानी सन्नाचा ताबा शिया अतिरेक्यांनी घेतल्यापासून येमेन अस्थिर झाला आहे. हे अतिरेकी हुथिस या नावाने ओळखले जातात. सन्ना ताब्यात आल्यापासून हे अतिरेकी आपला प्रभाव संपूर्ण येमेनमध्ये वाढवत आहेत.
या गटाला सुन्नी आदिवासी आणि अल कायदाची येमेनची शाखा हिंसक प्रतिकार करीत आहे. राडामध्ये महिनाभरात हुथिसला दुसऱ्यांदा लक्ष्य करण्यात आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी राडातील आदिवासी प्रमुखाच्या निवासस्थानी जमलेल्या लोकांमध्ये जाऊन आत्मघाती स्फोट करण्यात येऊन त्यात १२ पेक्षा जास्त जण ठार झाले होते.