सुसाईड बाँबरची माणुसकी, बोको हरामचा आदेश झुगारला
By admin | Published: February 12, 2016 06:00 PM2016-02-12T18:00:56+5:302016-02-12T18:00:56+5:30
सुसाईड बाँबर्स हजारो निरपराध्यांचा जीव घेत असताना एका तरूण मुलीनं बोको हरामचा आदेश धुडकावल्याची घटना समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अबुजा (नायजेरिया), दि. १२ - सुसाईड बाँबर्स हजारो निरपराध्यांचा जीव घेत असताना एका तरूण मुलीनं बोको हरामचा आदेश धुडकावल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आत्मघातकी तरूणांनी नायजेरियामध्ये शरणार्थींच्या शिबिरामध्ये घुसून स्फोट घडवले आणि त्यामध्ये त्यांच्यासह ५८ जण ठार झाले. बोको हरामच्या या आत्मघातकी पथकामध्ये एका तरुण मुलीचा समावेश होता. अंगभर स्फोटके लादून बोको हरामने या पथकाला जमावामध्ये घुसण्याचा आणि शक्य तितक्यांना ठार करण्याचा आदेश दिला. अनेक लोकांना आपण मारणार आहोत, या कल्पनेनं शेवटच्या क्षणी तिच्यातली माणुसकी जागी झाली आणि तिने अंगावरची स्फोटके झुगारून दिली बोको हरामच्या दहशतवाद्यांपासून चक्क सुटका करून घेत पळ काढला. तिच्याबरोबरच्या अन्य तरूणांनी मात्र आत्मघातकी बाँबस्फोट घडवले.
ही मुलगी नंतर स्थानिक संरक्षक दलांना सापडली आणि त्यावेळी लहान मुलांना ब्रेनवॉश करून कसं आत्मघातकी हल्ल्याचं प्रशिक्षण दिलं जातं यावर प्रकाश पडला.
ज्या शिबिरावर हल्ला करण्यास तिला सांगण्यात आलं होतं, त्याच शिबिरात तिचे वडिलही होते आणि आपण हल्ला केला तर आपणच नाही तर ते ही ठार होतील याची तिला कल्पना होती. बोको हरामच्या आदेशांना न मानता माणुसकीनं वागायला हवं असं जाणवलेल्या या मुलीनं तिच्या साथीदारांनाही हा विचार सांगितला. परंतु त्यांचा विचार बदलला नाही, त्यांनी स्फोट घडवले. तर या मुलीनं अंगाला बांधलेली स्फोटके फेकून देत बोको हरामपासून पळ काढला.
बोको हरामच्या इस्लामिक दहशतवादामुळे नायजेरियाचा काही भाग अशांत असून एकेका शरणार्थी शिबिरामध्ये ५० - ५० हजार लोकं आहेत. या मुलीमुळं बोको हरामच्या काही योजनांची सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली असून त्याचा सुरक्षेसाठी फायदा होत आहे.
बोको हरामच्या दहशतवादामुळे गेल्या सहा वर्षांमध्ये २० हजार लोकांनी प्राण गमावले आहेत, तर २५ लाख लोक बेघर झाले आहेत.