रशियन दुतावासावर आत्मघाती बॉम्बहल्ला; काबुलमध्ये दोन अधिकारी ठार, ११ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 04:20 PM2022-09-05T16:20:42+5:302022-09-05T16:21:14+5:30
आत्मघाती हल्लेखोर दूतावासाकडे जात असताना त्याला ठार करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.
काबुल : युक्रेन - रशियाच्या युद्धाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच आता रशियाला बाहेरच्या देशांतही हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील रशियन दुतावासासमोर आज भीषण आत्मघाती बॉम्बहल्ला झाला आहे. यामध्ये दोन रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत.
याबाबत तालिबान सरकारने आतापर्यंत काहीही माहिती दिलेली नाही. आत्मघाती हल्लेखोर दूतावासाकडे जात असताना त्याला ठार करण्यात आल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे. सोमवारी झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत असे एका नागरिकाने म्हटले आहे. काही रिपोर्टमध्ये २० जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
रशियन दुतावासासमोर व्हिसासाठी लोक अर्ज करायला आले होते. त्यांना लक्ष्य करायचे होते, असा प्राथमिक अंदाज आहे. रशियन सरकारचे वृत्तपत्र रिया नोवोस्तीने याबाबत अद्याप काही माहिती दिलेली नाही. परंतू, व्हिसासाठी आलेल्या लोकांना रशियाचे अधिकारी नाव विचारून त्यांची तपासणी करत होते, तेवढ्यात हा हल्ला झाला आहे. यात दोन अधिकारी देखील ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
2016 मध्ये देखील याच दुतावासासमोर बॉम्ब हल्ला झाला होता. या स्फोटात 12 जण ठार तर 20 हून अधिक जण जखमी झाले होते. शुक्रवारी हेरात प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात एक अफगाण धर्मगुरू तसेच इतर काही जण ठार झाले. मशिदीत आणखी एक स्फोट झाला होता ज्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता तर ३० जण जखमी झाले होते.