उत्तर कोरियाने बनवले घातक Suicide Drones; किम जोंग उनने स्वतः केली चाचणी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 04:33 PM2024-08-26T16:33:04+5:302024-08-26T16:33:37+5:30
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने आपल्या लष्कराची ताकद वाढवण्यार भरत देत आहे.
सेऊल : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सातत्याने आपल्या लष्कराची ताकद वाढवण्यार भरत देत आहे. किम जोंग उनचे क्षेपणास्त्र आणि घातक ड्रोन्सबद्दलचे प्रेम सर्वश्रृत आहे. ते सातत्याने आपल्या लष्कराच्या ताफ्यात विविध क्षेपणास्त्रे आणि डोन्सचा समावेश करत आहे. अशातच, उत्तर कोरियाने लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी विशेष आत्मघाती ड्रोन बनवले आहे. नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक किम जोंग उनच्या उपस्थितीत पार पडले.
अमेरिकन आणि दक्षिण कोरियन सैन्याचा सराव
सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही चाचणी झाली. ही चाचणी अशा वेळी घेण्यात आली, जेव्हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाचे सैन्य संयुक्त युद्धाभ्यास करत आहेत. उत्तर कोरियाकडून वाढत्या आण्विक धोक्यांपासून संरक्षण करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. दोन्ही देशांनी सांगितले की, गुरूवारपर्यंत चालणाऱ्या उल्ची फ्रीडम शील्ड सरावाचा उद्देश उत्तर कोरियाच्या विविध धमक्यांविरुद्ध त्यांची तयारी वाढवणे आहे.
दक्षिण कोरियाच्या सैन्याची बारीक नजर
उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, शनिवारच्या चाचणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनचा समावेश आहे. हे ड्रोन्स जमिनीवर आणि समुद्रात शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाचे या चाचणीवर बारीक लक्ष आहे. दक्षिण कोरियाचे 'जॉइंट चीफ ऑफ स्टाफ'चे प्रवक्ते ली चांग-ह्यून यांनी सांगितले की, दक्षिण कोरियाचे सैन्य उत्तर कोरियाच्या ड्रोन क्षमतेची बारकाईने तपासणी करत आहे.