वैद्यकीय रजेवर असताना टीव्हीवर लाईव्ह दिसल्याने तुरुंग अधिका-याची आत्महत्या
By admin | Published: October 9, 2015 06:48 PM2015-10-09T18:48:21+5:302015-10-09T18:48:21+5:30
कर्करोगावरील उपचारासाठी वैद्यकीय रजेवर असताना रग्बीचा सामना बघायला गेलेल्या एका महिला तुरुंग अधिका-याला नोकरी गमवावी लागली.
Next
ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. ९ - कर्करोगावरील उपचारासाठी वैद्यकीय रजेवर असताना रग्बीचा सामना बघायला गेलेल्या एका महिला तुरुंग अधिका-याला नोकरी गमवावी लागली. या प्रकारामुळे व्यथीत झालेल्या संबंधीत महिला अधिका-याने आत्महत्या केली असून महिलेच्या पालकांनी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. स्थानिक न्यायालयाने तुरुंग अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
युरोपमधील कार्डिफ तुरुंगात ३४ वर्षीय जॅनेट नॉरिज या महिला तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. महत्वाकांक्षी जॅनेट यांचे तुरुंग प्रमुख व्हायचे स्वप्न होते व यासाठी त्या अथक मेहनतही घ्यायच्या. मात्र २०११ मध्ये त्यांना कर्करोगाने ग्रासले व त्यांना वैद्यकीय रजा घ्यावी लागली. या रजेदरम्यान जॅनेट या मिलेनियम स्टेडियममध्ये रग्बीचा सामना बघायला गेलेल्या. या दरम्यान लाईव्ह टीव्हीवर त्यांची झलक दिसली व हा प्रकार कार्डिफ तुरुंगातील एका कर्मचा-याने बघितला. त्यांनी याविरोधात तुरुंग प्रशासनाकडे तक्रारही केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने जॅनेट यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तुरुंग प्रमुख होण्याचे स्वप्न भंगल्याने जॅनेट व्यथीत होत्या व यानंतर वर्षभराने त्यांनी आत्महत्या केली.
जॅनेटच्या पालकांनी याविरोधात तुरुंग प्रशासनाला कामगार न्यायालयात खेचले. जॅनेटच्या पालकांच्या या लढ्याला आता यश आले असून न्यायालयानेही जॅनेटच्या बाजूने निकाल दिला आहे. शिस्तभंगाची कारवाई करतानाच्या प्रक्रियेचा आढावा घेऊन त्याच आवश्यकतेनुसार बदल करा असे कोर्टाने म्हटले आहे.