पंजाबचा गँगस्टर सुखा दुनीकेची कॅनडात हत्या, हल्लेखोरांनी झाडल्या १५ गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 10:55 AM2023-09-21T10:55:50+5:302023-09-21T10:57:32+5:30
सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता.
पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील दविंदर बंबीहा टोळीतील सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनीके याची बुधवारी (२० सप्टेंबर) रात्री कॅनडामध्ये हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी सुखा दुनीके यांच्यावर जवळपास १५ गोळ्या झाडल्या. सुखा दुनीके हा मोस्ट वॉन्टेड अर्श डल्ला गँगशी संबंधित होता. तसेच, सुखा दुनीके हा टार्गेट किलिंगसाठी ओळखला जात होता. पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये दविंदर बंबीहा टोळीला मदत आणि निधी पुरवून तो मजबूत करत होता.
रिपोर्टनुसार, सुखा दुनीकेचा कल खलिस्तान समर्थक संघटनांकडेही होता. मात्र, तो मुख्यतः इतरांना खंडणीसाठी बोलावत असे आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये त्याचा सहभाग होता. तसेच, सुखा दुनीके आपल्या साथीदारांच्या मदतीने पंजाब आणि आसपासच्या राज्यात गुन्हे करत होता. गेल्या वर्षी १४ मार्च रोजी जालंधरच्या मल्ल्यान गावात कबड्डी सामन्यादरम्यान सुखा दुनीकेने कबड्डीपटू संदीप सिंग नांगल याचा साथीदारांच्या मदतीने हत्येचा कट रचला होता. त्याच्यावर पंजाब आणि शेजारील राज्यांमध्ये खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
हिंदुस्तान टाईम्सला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुखा दुनीके २०१७ मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातून कॅनडाला पळून गेला होता. दरम्यान, पंजाब आणि आसपासच्या भागातील जवळपास २९ गँगस्टर आहेत, जे कायद्यापासून वाचण्यासाठी भारताबाहेर आश्रय घेत आहेत. ते अनेक वर्षांपूर्वी भारतीय पासपोर्टवर किंवा बनावट प्रवासी कागदपत्रांच्या सहाय्याने नेपाळमार्गे दुसऱ्या देशात गेले होते.
दुसरीकडे, खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करत एनआयएने (NIA) काल म्हणजेच बुधवारी (२० सप्टेंबर) अर्श डल्ला टोळीवर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. याशिवाय, एनआयएने हरविंदर सिंग संधू उर्फ रिंडा आणि लखबीर सिंग संधू उर्फ लंडा यांच्यासह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्याच्या माहितीसाठी रोख बक्षीस जाहीर केले होते.