सनव्हॅलीत सुरू झाला अब्जाधीशांचा समर कॅम्प, अनेक दिग्गजांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 11:05 AM2021-07-07T11:05:42+5:302021-07-07T11:12:04+5:30
Sun Valley’s billionaire ‘summer camp’: वॉरेन बफेट, जेफ बेजोस, मार्क जकरबर्ग, आणि बिल गेट्ससह अनेक दिग्गजांची उपस्थिती
न्यूयॉर्क:अमेरिकेतील ग्रामीण भाग असलेल्या इदाहोमध्ये सध्या खासगी विमानांची गर्दी पाहायला मिळत आहे. यामागचे कारण म्हणजे, येथील साउथोथ राष्ट्रीय उद्यानात असलेल्या ‘सनव्हॅली’रिसॉर्टमध्ये सोमवारपासून जगातील अनेक अब्जाधीशांची वार्षिक परिषद सुरू झाली आहे. या परिषदेला 'बिलेनियर समर कॅम्प'देखील म्हटले जाते. या कॅम्पमध्ये तंत्रज्ञान, माध्यम, चित्रपट, क्रिडा आणि इतर अनेक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असते.
या बिलेनियर समर कॅम्पसाठी वॉरेन बफेट, जेफ बेजोस, अॅमेझॉनचे नवीन सीईओ अँडी जेसी, अॅपलचे टिम कुक, फेसबुकचे मार्क जकरबर्ग, डिस्कवरीचे सीईओ डेविड जैसलव, 20 सेंचुरी फॉक्सचे व्हाइस प्रेसिडेंट जॉन नैलन, यूएनच्या माजी अँबेसडर निकी हेली आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्ससह अनेक दिग्गज दाखल झाले आहेत. सध्या इदाहोच्या फ्राइडमॅन मेमोरियल विमानतळावर बिरझनेस जेट्सची मोठी गर्दी दिसत आहे. ही विमाने एका आठवड्यांसाठी इथेच राहतील. येथून 15 किमी दूर डोंगरांमध्ये सनव्हॅली रिसॉर्ट आहे.
पुढील 5 दिवस या दिग्गजांची ही कॉन्फ्रेंस चालेल आणि यात उद्योगांची रणनिती ठरवली जाईल. विशेष म्हणजे, या कॉन्फ्रेंसमध्ये मीडिया किंवा बाहेरील व्यक्तीला प्रवेश नसेल. तसेच, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला निगेटीव्ह कोव्हिड रिपोर्ट दाखवणे आणि लसीकरण करणे अनिवार्य असेल. या समर कॅम्पचे आयोजन इन्वेस्टमेंट बॅक अॅलन अँड कंपनी करत असते. कॉन्फ्रेंसच्या अजेंड्यात कोरोना महामारी आणि त्याचा उद्योगावर परिणाम, युझर्सची ऑनलाइन व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सला पसंती आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होईल.