पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी सुनीताला लागतील ४५ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 12:36 IST2025-03-21T12:36:29+5:302025-03-21T12:36:44+5:30
आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी घ्यावी लागणार प्रचंड मेहनत...

पृथ्वीवर जुळवून घेण्यासाठी सुनीताला लागतील ४५ दिवस
न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नियोजित सात दिवसांच्या मोहिमेवर गेलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर तब्बल २८६ दिवस तेथे अडकून पडले. अंतराळात सर्वच शारीरिक प्रक्रियांवर परिणाम होतो. मग प्रकृतीतील बदलांच्या वाईट परिणामांपासून सावरण्यासाठी तुमचा आहारही तसाच असावा लागतो. या काळात कॅलरीज टिकवून ठेवणाऱ्या सकस व पौष्टिक आहाराने सुनीताच्या प्रकृतीला सावरले. आता पृथ्वीवर परतल्यानंतर शरीराच्या नियंत्रणासह आखडलेल्या मांसपेशी लवचिक करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. यासाठी किमान ४५ दिवस अथक प्रयत्न करावे लागतील.
अंतराळात त्यांनी काय खाल्ले?
सुनीता विल्यम्स व विल्मोर यांचा आहार तसाच पौष्टिक होता. यात पावडर दूध, श्रींप कॉकटेल, पिझ्झा, रोस्ट पदार्थ होते. यात आणखी पौष्टिक काही खाण्याची सुविधा नव्हती; कारण अंतराळ स्थानकावरील मुक्काम अचानक वाढल्याने यावर खूप मर्यादा होत्या.
शरीरावर काय परिणाम?
अंतराळात एवढ्या कालावधीत शरीराला ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तातील लाल पेशी हळूहळू ५० टक्के कमी होतात.या ‘स्पेस ॲनिमिया’तून अनेक समस्या निर्माण होऊ शकतात; कारण रक्ताचे प्रमाण कमी होत असल्याने हालचाली, क्षमता व मेंदू या सर्वांवरच हळूहळू परिणाम दिसू लागतो. यासाठी आहारही तसाच पौष्टिक असावा लागतो.
किती रुपये मिळणार?
अंतराळात नऊ महिने अडकून पडलेली सुनीता व बूच २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतले. नियोजित कालावधीपेक्षा २७८ जादा दिवस ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिले; परंतु हे सारे घडले यानातील बिघाडामुळे. नियमानुसार यासाठी दोघांनाही ओव्हरटाइम भत्ता मिळणार नाही; कारण, या काळात त्यांना प्रासंगिक भत्ता म्हणून प्रतिदिन ५ डॉलर दिले जात होते.
पृथ्वीवर परतल्यानंतर कशी असेल दिनचर्या?
पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्सला चालताना अडचणी येतील. दृष्टीवरही काहीसा परिणाम होईल.
शिवाय, रक्ताचे प्रमाण पुन्हा सामान्य हाेण्यासाठी आहारावर लक्ष ठेवावे लागेल.
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार या सर्व गोष्टी सुरळीत होण्यासाठी किमान ४५ दिवस लागतील.
त्यानंतर तिची दिनचर्या पृथ्वीवरील वातावरणानुसार पूर्णपणे नियमित होण्यासाठी एक वर्ष लागेल.
क्रिस्टिना कोच पहिली, तर सुनीता दुसरी
अंतराळात सर्वाधिक काळ वास्तव्य करणारी सुनीता विल्यम्स दुसरी अंतराळवीर ठरली आहे. ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिने एकूण २८६ दिवस अंतराळात घालवले आहेत. यात क्रिस्टिना कोचचा ३२८ दिवसांसह पहिला क्रमांक आहे.
सुनीताला आरोग्याच्या दृष्टीने पृथ्वीवर परतल्यानंतर आता वैद्यकीय सल्ल्यानुसार तीन टप्पे पार करावे लागतील. यात प्रथम स्वत:हून चालताना नियंत्रण मिळवणे, शरीर लवचिक करणे आणि कमकुवत मांसपेशी पुन्हा बळकट करणे.