सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 08:15 IST2025-02-01T08:14:52+5:302025-02-01T08:15:24+5:30
जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत.

सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे
वॉशिंग्टन : भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्सने ६२ तास ६ मिनिटे स्पेस वॉक करून इतर महिला अंतराळवीरांना मागे टाकले आणि सर्वाधिक वेळ स्पेसवॉक केल्याचा नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला. जून-२०२४ पासून अंतराळ स्थानकावर अडकून पडलेली सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर यांनी गुरुवारी स्थानकाच्या बाहेर येत स्कायवॉक केला.
सुनीता आणि बूच यांनी नादुरुस्त रेडिओ संचार उपकरणे काढून टाकली. काही नमुनेही घेतले. त्यावरून प्रयोगशाळेच्या बाह्य भागात काही सूक्ष्म जीव अस्तित्वात आहेत का, हे समजेल.
अशा होत्या स्कायवॉकच्या वेळा, एकूण ६२ तास ६ मिनिटांची नोंद
अमेरिकी प्रमाणवेळेनुसार सकाळी ७:४३ वाजता स्कायवॉक सुरू करून दुपारी १:०९ वाजता संपवला. हा कालावधी ५:२६ मिनिटे होता. या स्कायवॉकमुळे सुनीताच्या नावे एकूण ६२:६ तासांची नोंद झाली आणि यापूर्वी पेगी व्हिटसनच्या नावे ६० तास २१ मिनिटांचा विक्रम नोंद होता.
पृथ्वीवर कधी परतणार?
जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत. आता स्पेस-एक्सच्या यानातून त्यांना परत आणण्याची योजना असली तरी यासाठी मार्चअखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.