दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:11 PM2024-08-22T19:11:19+5:302024-08-22T19:12:02+5:30

तांत्रिक बिघाडामुळे सुनिता विलियम्स आणि बुच विलमोर दोन महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत.

Sunita Williams stuck in space for two months; Increased risk of serious diseases | दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

दोन महिन्यांपासून Sunita Williams अंतराळात अडकल्या; गंभीर आजारांचा धोका वाढला...

Astronaut Sunita Williams : अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स (sunita williams) यांच्या परतीच्या मार्गात अडचणी वाढल्या आहेत. 2 जून रोजी फक्त दोन आठवड्यांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता आणि बुच विल्मोर अद्याप पृथ्वीवर परत येऊ शकलेले नाहीत. NASA च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ते दोघेही फेब्रुवारी 2025 पूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकणार नाहीत.

आरोग्यावर गंभीर परिणाम
बोईंग स्टारलाइनरद्वारे जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या सुनीता आणि बुच यांच्या परतीच्या मार्गात मोठ्या अडचणी आहेत. दरम्यान, इतके महिने अंतराळात राहिल्यामुळे दोघांच्याही आरोग्यावर वाईट परिणाम पडू शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, त्यांना अंतराळवीरांच्या डीएनएला धोका आहे. अंतराळातील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत नगण्य आहे, त्यामुळे हाडे आणि स्नायूंची घनता कमी होऊ शकते. 

स्पेस ॲनिमियाचा धोका
इतकेच नाही, तर अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने शरीरातील द्रवपदार्थांमध्येही बदल होतो, त्यामुळे पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात जास्त लाल रक्तपेशी नष्ट होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनमुळे होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण लाल रक्तपेशींना नुकसान करतो. नासाच्या मते, पृथ्वीवर एका व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक सेकंदाला सुमारे 20 लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि नष्ट होतात, परंतु अंतराळात ही संख्या 30 लाखांपर्यंत वाढते. त्यामुळे अंतराळवीरांना स्पेस ॲनिमिया होतो.

कर्करोगाचा धोका
अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये हृदय देखील योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या संरचनेतही बदल होतात. याव्यतिरिक्त, स्पेस रेडिएशनच्या संपर्कात आल्याने कर्करोगाचा धोका देखील वाढतो. अंतराळातून परतल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी डोळ्यांशी संबंधित समस्याही सांगितल्या आहेत.

डीएनए मध्ये असमानता
तज्ज्ञांच्या मते, कॉस्मिक रेडिएशन हे अत्यंत उच्च उर्जेच्या कणांनी बनलेले असते. ते संपर्कात येते, तेव्हा डीएनए स्ट्रेंड तुटतात आणि बदल होऊ लागतात. अंतराळवीरांच्या आरोग्याशी संबंधित ही सर्वात गंभीर समस्या आहे. दीर्घकाळ रेडिएशनच्या संपर्कात राहिल्यामुळए मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

सुनीता विल्यम्स अवकाशातून परत कधी येऊ शकणार?
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 10 दिवसांच्या मोहिमेसाठी गेले होते, परंतु बोईंग स्टारलाइनरमधील तांत्रिक बिघाडामुळे ते गेल्या दोन महिन्यांपासून पृथ्वीवर परत येऊ शकले नाहीत. नासाचे म्हणणे आहे की जर स्टारलाइनर्स परत येणे सुरक्षित मानले गेले नाही तर ते फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनसह पृथ्वीवर परत येतील.

Web Title: Sunita Williams stuck in space for two months; Increased risk of serious diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.