सुन्नी बंडखोर बगदादच्या अगदी जवळ
By admin | Published: June 18, 2014 05:24 AM2014-06-18T05:24:13+5:302014-06-18T05:24:13+5:30
इराकची राजधानी बगदादपासून केवळ ६० किमी अंतरावरील बाकबा शहराला मंगळवारी आयएसआयएलच्या सुन्नी कट्टरवाद्यांनी वेढा घातला
बगदाद : इराकची राजधानी बगदादपासून केवळ ६० किमी अंतरावरील बाकबा शहराला मंगळवारी आयएसआयएलच्या सुन्नी कट्टरवाद्यांनी वेढा घातला. इराकी सैन्य आणि कट्टरवाद्यांत गेल्या आठवडाभरापासून इराकच्या पूर्व आणि मध्य भागात भीषण चकमक सुरू आहे. युनोने देशातील हिंसाचारामुळे इराकचे अस्तित्वच धोक्यात असल्याचा इशारा दिला.
युनोच्या इराकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने देशातील हिंसाचारामुळे इराकचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात असल्याचा इशारा दिला. ‘सध्या इराकचे अस्तित्वच धोक्यात असून याचा संपूर्ण प्रदेशावर गंभीर परिणाम होईल. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठ्या धोक्याचा इराक सामना करत आहे,’ असे हा अधिकारी म्हणाला.
दहशतवाद्यांच्या ताब्यातील शहरांवर पुन्हा ताबा मिळवण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू असल्याचा दावा इराकी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड लवेंट अर्थात आयएसआयएल ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे. दहशतवाद्यांनी राजधानी बगदाद आणि इराकच्या शियाबहुल भागात घुसण्याची धमकी दिली आहे.
हिंसाचारामुळे लाखोंना स्थालांतरित व्हावे लागले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा देशातील तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)