सुपर स्मार्ट शहर, ना रस्ता आणि ना कार! सौदीत निओम शहर सौर-पवन ऊर्जेवर चालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:41 AM2023-02-22T08:41:35+5:302023-02-22T08:41:56+5:30
निओमचे सीईओ नदमी अल-नासर म्हणतात की येथे लागणारी विजेची गरज सौर आणि पवन ऊर्जेद्वारे भागवली जाईल.
दुबई : सौदी अरेबियाने आपली अर्थव्यवस्था इंधन आधारितवरून केव्हा पर्यटन आधारित केली हेही कोणाच्या लक्षात आले नाही. देशाचा संपूर्ण चेहरामोहराच मागील काही दशकांत बदलला आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी प्रत्येक गोष्ट तेथे उभारण्यात आली आहे. आता त्यात पर्यावरणपूरक सुपर स्मार्ट सिटीची भर पडणार आहे, जेथे ना रस्ते असतील ना कार.
वायव्य सौदी अरेबियाच्या ताबूक प्रांतात बनवले जाणारे निओम ही सुपर स्मार्ट सिटी पूर्णपणे स्वच्छ ऊर्जेवर चालणार आहे. सुमारे ५०० अब्ज डॉलर्सच्या या शहरात रस्ते नाहीत, गाड्याही धावणार नाहीत. हे शून्य कार्बन उत्सर्जन असलेले शहर असेल. विशेष म्हणजे शहराचे २० टक्के काम पूर्णही झाले आहे.
कायदेही वेगळे
सध्याच्या शासकीय रचनेपासून शहर स्वतंत्रपणे काम करेल. त्याच्या स्वतःच्या कर आणि कामगार कायद्यांव्यतिरिक्त एक स्वायत्त न्यायिक प्रणाली असेल. शहरात बंदरे, एंटरप्राइझ झोन, संशोधन केंद्रे, पर्यटन, क्रीडा केंद्रे आणि अनेक मनोरंजन स्थळांसह निवासी क्षेत्रे असतील.
आव्हाने सोडवणार
अल-नासर म्हणतात की निओमच्या माध्यमातून, आम्ही मानवजातीसमोरील काही अत्यंत गंभीर आव्हाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. निओम हा ग्रीक शब्द निओ (नवीन) आणि अरबी शब्द मुस्तकबिलचे (भविष्य) पहिले अक्षर यांचे मिश्रण आहे.
निओमचे सीईओ नदमी अल-नासर म्हणतात की येथे लागणारी विजेची गरज सौर आणि पवन ऊर्जेद्वारे भागवली जाईल. हायड्रोजनवर आधारित वीजनिर्मितीही होईल. लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील या मेगासिटी प्रकल्पाची घोषणा ऑक्टोबर २०१७ मध्ये सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी रियाधमधील गुंतवणूक परिषदेत केली होती. सौदी अरेबियाने ‘व्हिजन २०३०’च्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची तयारी सुरू केली आहे. ‘व्हर्टिकल फार्मिंग’ आणि हरितगृहांचा वापर करून निओमला जगातील सर्वात मोठे अन्नस्वावलंबी शहर बनवू इच्छित आहे. सध्या, सौदी अरेबिया आपल्या अन्नधान्यांपैकी सुमारे ८० टक्के धान्य आयात करतो.