हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा भारताकडून ५५ देशांना पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 11:35 PM2020-04-17T23:35:35+5:302020-04-17T23:35:46+5:30
कोरोनावरील उपचारांसाठी उपयुक्त; निर्यातबंदी उठविल्यानंतर मागणी वाढली
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या उपचारांकरिता हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध भारत अमेरिकेसह जगभरातील ५५ देशांना सध्या निर्यात करत आहे. मलेरियावरील उपचारांसाठी वापरले जाणारे हे औषध कोरोनाच्या निर्मूलनासाठीही उपयोगी आहे, असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित अनेक लोकांचा दावा आहे. त्यामुळेही या औषधाला विविध देशांतून इतकी मागणी येत आहे.
भारताने पाठविलेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाचा साठा अमेरिका, मॉरिशस, सेशेल्स आदी देशांना याआधीच मिळाला आहे. तर बाकीच्या देशांना या औषधाचा पुरवठा चालू आठवड्याअखेरपर्यंत करण्यात येईल. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी प्रभावी औषध असल्याचे अमेरिकी अन्न व औषधे खात्याने म्हटले आहे. या औषधाचा प्रयोग न्यूयॉर्कमधील १५००हून अधिक रुग्णांवर करण्यात आला होता.
कोरोनाची साथ पसरल्यानंतर देशात आवश्यक औषधांचा पुरेसा साठा कायम राखण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनसह काही औषधांच्या निर्यातीवर मोदी सरकारने तात्पुरती बंदी घातली होती. त्यानंतर हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध पाठवावे अशी विनंती ट्रम्प सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. हे औषध अमेरिकेला न पाठविल्यास भारताला त्याचे परिणाम भोगावे लागतील अशीही धमकी ट्रम्प यांनी दिली. मात्र अशा धमक्यांना भीक न घालता भारताने सर्व स्थितीचा आढावा घेऊन औषधांवरील निर्यातबंदी काही दिवसांनी उठविली. भारत हा अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका, म्यानमार आदी देशांनाही हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा साठा लवकरच पाठविणार आहे. पाकिस्तानने भारताकडे या औषधाची मागणी केली आहे की नाही, हे अद्याप कळू शकलेले नाही.
रशिया, फ्रान्स आदींचाही समावेश
भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा पुरवठा होणार असलेल्या कोरोनाग्रस्त देशांमध्ये झांबिया, डॉमिनिकन रिपब्लिक, मादागास्कर, युगांडा, बुर्किना फासो, माली कोंगो, इजिप्त, अर्मेनिया, कझाकिस्तान, इक्वेडोर, युक्रेन, झिम्बाब्वे, फ्रान्स, जॉर्डन, केनिया, नेदरलँड्स, ओमान, पेरु , फिलिपिन्स, रशिया, स्लोव्हेनिया, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिरात (यूएइ) उझबेकिस्तान, उरुग्वे, कोलंबिया, अल्जेरिया बहामाज, ब्रिटनआदी देशांचाही समावेश आहे.