पाकिस्तानातूनही मराठा आरक्षणाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 11:05 AM2017-08-08T11:05:43+5:302017-08-08T12:12:00+5:30
बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे
इस्लामाबाद, दि. 8 - मुंबईत बुधवारी होणा-या मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी सुरु असून, अनेकांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान मोर्चाला फक्त भारतातूनच नाही तर कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानातूनही पाठिंबा मिळत आहे. बलुचिस्तानातील मराठा समाजाच्या ‘मराठा कौमी इतेहाद’ या संघटनेने भारतातील मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मराठा ट्राईब या फेसबूक पेजवर मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. फेसबूक पेजवर पाठिंबा जाहीर करणारी पोस्ट टाकण्यात आली आहे.
काय लिहिलं आहे पोस्टमध्ये -
भारतामध्ये मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला ‘मराठा कौमी इतेहाद’च्या प्रमुखाचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं गेलं पाहिजे. हा त्यांचा हक्क असून त्यांच्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांचा प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल. पाकिस्तानात मराठ्यांना हक्क मिळत असताना, भारतात ते का मिळत नाहीत. पाकिस्तानातील मराठा समाजाकडून जाहीर निषेध.
कोण आहेत पाकिस्तानमधील मराठा -
पानीपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर मराठ्यांना अफगाणिस्तानमध्ये नेलं जात होतं. पण ते शक्य झालं नाही, त्यामुळे त्यांना बलुचिस्तानात ठेवण्यात आलं. तिथं त्यांचं धर्मांतर झालं. पण त्यांनी त्यांच्या नावात मराठा नाव अजूनही जोडलेलं आहे. मराठा असण्याचा त्यांना अभिमान आहे.
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्ष उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे.