भारताच्या एनएसजी सदस्यत्वाला बहुतांश देशांचा पाठिंबा
By admin | Published: June 10, 2016 12:17 AM2016-06-10T00:17:07+5:302016-06-10T00:17:07+5:30
आण्विक पुरवठादार समूहाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारताला एकीकडे अनेक देशांचा पाठिंबा मिळत असताना चीनने मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे
ऑनलाइन लोकमत
व्हिएन्ना, दि. 10- आण्विक पुरवठादार समूहाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारताला एकीकडे अनेक देशांचा पाठिंबा मिळत असताना चीनने मात्र आपला विरोध कायम ठेवला आहे. भारताच्या या सदस्यत्वाच्या मुद्यावर एनएसजीची दोन दिवसीय बैठक गुरुवारी आॅस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नात सुरू झाली आहे.
भारताला गुुरुवारी मेक्सिकोचे समर्थन मिळाले; पण व्हिएन्नात ४८ देशांच्या या समूहाच्या बैठकीत चीनने भारताच्या दावेदारीचा विरोध केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश देश भारताच्या बाजूने आहेत. ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. अमेरिकाही भारताला या मुद्यावर पाठिंबा देत आहे.
(एनएसजी सदस्यत्वासाठी भारताचा अर्ज)
दरम्यान, व्हिएन्नातून मिळत असलेल्या माहितीनुसार भारताला विरोध करणाऱ्या देशांचे नेतृत्व चीन करीत आहे. असेही सांगण्यात येत आहे की, तुर्की, न्यूझीलंड, आयर्लंड, दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रिया हे देश चीनच्या भूमिकेचे समर्थन करीत आहेत. चीन सातत्याने भारताला या मुद्यावर विरोध करीत आहे. चीनचे असे म्हणणे आहे की, अणू अप्रसार संधीवर (एनपीटी) हस्ताक्षर करणाऱ्या देशांनाच एनएसजीची सदस्यता मिळायला हवी. तसेच जर भारताला एनएसजीचे सदस्यत्व देण्यात आले, तर पाकिस्तानलाही या संघटनेचे सदस्यत्व दिले जावे.