काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा

By admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:07+5:302016-06-07T07:43:07+5:30

भारताच्या समावेशास स्वित्झर्लंडने सोमवारी पाठिंबा दिल्याने एनएसजी सदस्य बनण्याच्या भारताच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले

Supporting India for black money | काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा

काळ्या पैशांसाठी भारताला पाठिंबा

Next


जिनिव्हा : अणुव्यापार करणाऱ्या ४८ राष्ट्रांंचा समूह अर्थात, न्यूक्लिअर सप्लायर्स ग्रुपमध्ये (एनएसजी) भारताच्या समावेशास स्वित्झर्लंडने सोमवारी पाठिंबा दिल्याने एनएसजी सदस्य बनण्याच्या भारताच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. याशिवाय उभय देशांनी करचोरी आणि काळ्या पैशाच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. स्विस बँकेतील भारतीयांच्या काळ्या पैशाबाबतचे सहकार्य वाढविण्यावर उभय नेत्यांत चर्चा झाली.
एनएसजी सदस्य बनण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे, असे स्विस राष्ट्राध्यक्ष जोहान शायन्डर अम्मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले. तत्पूर्वी उभय नेत्यांची बैठक झाली. एनएसजीचे सदस्यत्व मिळावे, यासाठी भारत दीर्घकाळापासून लॉबिंग करीत आहे. मात्र, चीनच्या विरोधामुळे भारताला या समूहात घेण्यात आले नाही. स्वत:चे अणुतंत्रज्ञान विकसित करूनही भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरीस नकार दिला आहे. त्यामुळे त्याला एनएसजीत घेण्यात येऊ नये, असे चीनचे म्हणणे आहे. स्वित्झर्लंडचा पाठिंबा मिळविणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. पाठिंब्याबद्दल स्विस राष्ट्राध्यक्षांचे आभार मानताना मोदी म्हणाले की, ‘सध्याचे जागतिक वास्तव डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय संघटनांत सुधारणा केली जावी, अशी भारत आणि स्वित्झर्लंडची भूमिका आहे. संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे सदस्य बनण्याचा भारत आणि स्विसचा प्रयत्न असून, आम्ही त्यासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ केला आहे,’ असेही मोदी म्हणाले. ‘एनएसजी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल मी स्विस राष्ट्राध्यक्षांचे आभार मानतो,’ असे मोदी अम्मान यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.
>सेऊल येथे अर्जावर विचार
एनएसजी सदस्यत्वासाठी गेल्या १२ मे रोजी भारताने अर्ज केला असून, ९ जून रोजी व्हिएन्ना येथे व २४ जून रोजी सेऊल येथे होणाऱ्या बैठकीत एनएसजी भारताच्या अर्जावर विचार करणार आहे.
कर चोरांना शिक्षा ठोठावण्यास माहितीची तातडीने देवाणघेवाण करण्याच्या गरजेवर चर्चा झाली. माहितीची स्वत:हून देवाण-घेवाण करण्याच्या कराराच्या दृष्टीने ही चर्चा लाभदायक ठरली. - नरेंद्र मोदी
फसवणूक आणि करचोरीच्या मुकाबल्यात दोन्ही देश चांगली प्रगती करीत आहेत.
- जोहान शायन्डर अम्मान, स्विस राष्ट्राध्यक्ष

Web Title: Supporting India for black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.