निर्णयावर फेरविचार करण्याची नवाज शरिफ यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 05:29 PM2017-09-15T17:29:41+5:302017-09-15T17:30:38+5:30

बहुचर्चित पनामागेटप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आल्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणारी नवाज शरिफ यांची याचिका पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे

Supreme Court dismisses Sharif's plea to reconsider his decision | निर्णयावर फेरविचार करण्याची नवाज शरिफ यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

निर्णयावर फेरविचार करण्याची नवाज शरिफ यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Next

इस्लामाबाद, दि. 15 - बहुचर्चित पनामागेटप्रकरणी दोषी ठरवत पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आल्याच्या निर्णयावर फेरविचार करण्यात यावा अशी मागणी करणारी नवाज शरिफ यांची याचिका पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. नवाज शरिफ यांच्यासहित त्यांची मुलं आणि अर्थमंत्री इशक दार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी ही याचिका केली होती. याआधी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. 

डिटेल ऑर्डरमध्ये फेरविचार याचिका फेटाळण्याच्या कारणांचा उलगडा होईल. याचिका फेटाळली गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहणार आहे. गुरुवारी न्यायालयाने नवाज शरिफ यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला होता. 'तुमच्याविरोधात निर्णय गेला म्हणून इतकं धास्तावण्याची गरज नाही', असं न्यायाधीस आसिफ सईद खोसा बोलले होते. 

पनामागेटप्रकरणी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत पंतप्रधान पदावरुन हटवलं आहे. पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं. न्यायालयाच्या निर्णयानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले.

काय आहे पनामागेट प्रकरण?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती,  सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत. 

मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती. 

ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.
 

Web Title: Supreme Court dismisses Sharif's plea to reconsider his decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.