पुन्हा सर्जिकल स्ट्राइक?; म्हणून पाकिस्तानींना सतावतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:14 AM2023-04-28T07:14:23+5:302023-04-28T07:16:02+5:30
पाकचे माजी उच्चायुक्त बासीत यांचा दावा, पूंछमधील हल्ल्यानंतर शक्यता वाढली
इस्लामाबाद : भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, अशी पाकिस्तानच्या मनात भीती आहे. तसे वक्तव्य पाकिस्तानचेभारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी केले आहे. २० एप्रिलला पूंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या भीतीने पुन्हा डोके वर काढले आहे, असे बासीत यांनी सांगितले.
बासीत यांनी यूट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हिडीओत हा मुद्दा मांडला. ‘एससीओ’च्या बैठकीसाठी पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो भारतात येणार आहेत. त्यापूर्वी बासीत यांनी हे वक्तव्य केले.
२९ सप्टेंबर २०१६
उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात ११ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने सीमा ओलांडून पाकमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ५० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले.
२६ फेब्रुवारी २०१९
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४६ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राइक करून बालाकोट येथील दहशतवादी तळ नष्ट करून ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला हाेता.
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
पाकने गेल्या सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीतही काश्मीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्या कांगाव्यालाही भारताने खणखणीत उत्तर दिले होते. ३७० कलम, तसेच जम्मू- काश्मीरला असलेला विशेष दर्जाही केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्दबातल केला होता. त्याला पाकिस्तानने विरोध केला होता. यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला.
जम्मू-काश्मीर, लडाख
आमचाच अविभाज्य भाग : भारत
n काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा एकदा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खडसावले.
n कितीही कांगावा केला तरी जम्मू-काश्मीर, लडाख हा आमचाच अविभाज्य भाग आहे व यापुढेही राहील, असे भारताने बजावले आहे.
n पाकचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी काश्मीर प्रश्नाचा उल्लेख केला होता.
n त्यास भारताचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरूपी प्रतिनिधी प्रतीक माथूर यांनी चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानने काश्मीरबद्दल कितीही कांगावा, तसेच अपप्रचार केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. जम्मू- काश्मीर, लडाख हे भारताचाच अविभाज्य भाग आहेत. - प्रतीक माथूर