आश्चर्यच! या यंत्राच्या सहाय्याने हवेतून मिळवता येणार पिण्याचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:08 AM2018-12-04T11:08:09+5:302018-12-04T11:09:40+5:30
विज्ञानाच्या दुनियेमध्ये रोज नवनवे आविष्कार होत असतात. त्यापैकी काही शोध तर सर्वसामान्यांना आश्चर्याचे धक्के देणारे असतात.
दुबई - विज्ञानाच्या दुनियेमध्ये रोज नवनवे आविष्कार होत असतात. त्यापैकी काही शोध तर सर्वसामान्यांना आश्चर्याचे धक्के देणारे असतात. असाच एक शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. शास्त्रज्ञांनी आता असे एक यंत्र विकसित केले आहे ज्याच्या मदतीने हवेतून पिण्यायोग्य पाणी मिळवता येणार आहे. अत्यंत साधेसोपे असलेले हे यंत्र हवेतून पाणी शोषून घेते. तसेच सूर्याची उष्णता मिळाल्यावर पाणी सोडते. सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे अनोखे यंत्र विकसित केले आहे.
पृथ्वीभोवतीच्या वातावरणामध्ये सुमारे 13 ट्रिलीयन टन एवढे पाणी बाष्प रूपात आहे. या पाण्याचा वापर करून पिण्यायोग्य पाणी बनवता येऊ शकते. विविध यंत्रसामुग्रीचा वापर करून या पाण्याचा नियमित आणि किफायतशीर वापर करता येईका, हे चाचपण्यासाठी विविध चाचण्या घेण्यात आल्या होत्या.
दरम्यान, हे नवे प्रोटोटाइप डिव्हाइस सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील तंत्रज्ञांनी विकसित केले आहे. या यंत्रामध्ये पाणी शोषून घेण्यासाठी मिठाचा वापर करण्यात आला आहे. मिठामध्ये हवेतून बाष्प शोषून घेण्याची उच्च क्षमता असते, असे रेनयुंग ली या विद्यार्थ्याने सांगितले. हे पाणी मिठामध्ये शोषले जाऊन हे मीठ द्रवरूपात साठते. पुढे सूर्यप्रकाशामुळे या पाण्याचे बाष्प होऊन पिण्यायोग्य शुद्ध पाणी मिळते.