आश्चर्याचा धक्का - घरबसल्या पगाराचा प्रस्ताव स्विस जनतेने बहुमताने फेटाळला
By admin | Published: June 6, 2016 03:33 PM2016-06-06T15:33:22+5:302016-06-06T15:33:22+5:30
घरबसल्या पगार देण्याचा सरकारचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या जनतेने बहुमताने फेटाळला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
जिनिव्हा, दि. 6 - घरबसल्या पगार देण्याचा सरकारचा प्रस्ताव स्वित्झर्लंडच्या जनतेने बहुमताने फेटाळला आहे. यांत्रिकीकरण, रोबोट आणि जागतिकीकरणामुळे नोकऱ्या मिळत नसल्याने सरकारने प्रत्येक नागरिकाला दर महिन्याला 2,500 फ्रँक व प्रत्येक लहान मुलाला 625 फ्रँक देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. केवळ पैसे कमावण्यासाठी नोकरीच्या चक्रात न अडकता लोकांनी आपल्या आवडत्या छंदांना वेळ द्यावा असा उद्देशही सरकारचा होता. मात्र, हा प्रस्ताव स्विस जनतेने 76.9 टक्के विरुद्ध 23.1 टक्के असा बहुमतानं फेटाळला आहे.
यांत्रिकीकरणामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून रोबोट माणसाची कामं करत आहेत. तसेच, स्थलांतरीतांमुळेही स्थानिकांच्या नोकरीच्या संधी हिरावल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर किमान वेतन घरबसल्या मिळावं अशी मागणी करण्यात येत होती. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण पडेल अशी स्विस सरकारची अधिकृत भूमिका होती.
यावर मार्ग काढण्यासाठी सार्वमत घेण्यात आलं, आणि बहुमतानं स्विस जनतेने घरबसल्या पगाराचा प्रस्ताव नाकारला. यामुळे अत्यंत प्रगत आणि जबाबदार लोकशाहीचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. असा पगार दिला तर त्याचा ताण सरकारी तिजोरीवर पडेल, कर वाढतिल आदी विचार सूज्ञ जनतेने केल्याचे या निमित्ताने दिसल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.