आश्चर्य.. रोबोटने वाचवले कपाटाखाली सापडणाऱ्या मुलीला
By admin | Published: July 6, 2017 08:01 PM2017-07-06T20:01:13+5:302017-07-06T20:03:47+5:30
वस्तू काढण्यासाठी चढलेल्या मुलीवर कोसळणारे कपाट पकडून एका रशियन रोबोटने तिचा जीव वाचवण्याची आश्चर्यकारक घटना रशियात घडली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
सेंट्रल रशिया, दि. 6- वस्तू काढण्यासाठी चढलेल्या मुलीवर कोसळणारे कपाट पकडून एका रशियन रोबोटने तिचा जीव वाचवण्याची आश्चर्यकारक घटना रशियात घडली आहे. पर्म पॉलिटेक्निक युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या चित्रफितीमध्ये प्रोमोबोट नावाचा रशियन बनावटीचा रोबोट कपाटाखाली चिरडण्यापासून एका मुलीला वाचवल्याचे दिसत आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार कपाटातील वस्तू काढण्यासाठी त्यावर चढणाऱ्या मुलीवर वस्तू कोसळत असताना कपाटही तिच्यावर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. यावेळेस रोबोटने स्वतःहून पुढे जात कपाटाला धरले आणि मुलीचा जीव वाचवला. या रोबोटचा निर्माता ओल्गेव किवोकुर्टस्केव्ह याने रोबोटने कोणत्याही आज्ञेविना पुढे जात मुलीचा जीव वाचवला असा दावा केला आहे.
एका लॉबीमध्ये रोबोटच्या समोर असलेल्या कपाटाजवळ एक मुलगी स्वतः चालत येत असल्याचे व्हीडिओत दिसते. त्यानंतर ही मुलगी वस्तू काढण्यासाठी कपाटावर चढताना दिसते. तिच्या वजनामुळे कपाट पुढे येऊन त्यातील वस्तू खाली पडताना दिसतात. एका क्षणी कपाट त्या मुलीच्या अंगावर पडण्याची शक्यता निर्माण होताच हा रोबोट स्वतः पुढे येऊन ते कपाट एका हाताने रोखून दिसताना व्हीडिओत दिसतो. काही तज्ज्ञांच्या मते हे मिरर मोडमुळे झाले असावे. जेव्हा मुलीने तेथे प्रवेश केला तेव्हा रोबोटही कपाटाच्या दिशेने सरकतो. जेव्हा ती हात वर करून कपाटावर चढू लागते तेव्हा त्याचेही हात वर जातात त्यामुळे हा सगळा केवळ योगायोग असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. तर रोबोटने मुलीला वाचवण्याचा प्रकार स्वतःहून केल्याचा दावा काही तंत्रज्ञान विषयात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी खोटा ठरवला आहे.
प्रोमोबोटचा निर्माता ओल्गेवने मात्र रोबोटच्या या कृतीवर आनंद व्यक्त केला आहे. कपाट कोसळण्याच्या वेळेस रोबोट तेथे होता ही चांगली बाब असल्याचे सांगत आम्ही लोकांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करतो असेही ओल्गेवने सांगितले आहे.
(व्हिडिओ साभार - यूट्युब)