सर्व्हे : इम्रान खान बनू शकतो पाकिस्तानचा पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 04:50 PM2018-07-23T16:50:55+5:302018-07-23T16:51:19+5:30
पाकिस्तानमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचा धामधूम सुरू असून, येत्या बुधवारी तेथे मतदान होणार आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचा धामधूम सुरू असून, येत्या बुधवारी तेथे मतदान होणार आहे. पाकिस्तानमध्ये अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत तीन पक्षात होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेजारील देश म्हणून भारताचेही या निवडणुकीवर बारीक लक्ष आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील डॉन न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार पाकिस्तानमध्ये यावेळी माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पक्ष सत्तेच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डॉन न्यूजने केलेल्या सर्व्हेनुसार 1997 पासून राजकारणात नशीब आजमावत असलेल्या इम्रान खानचे स्वप्न यावेळी पूर्ण होण्याची शक्यता आहे. या सर्वेमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश होता. ज्यांचे वय 18 ते 44 च्या दरम्यान होते. तसेच इम्रान खानच्या पीटीआय या पक्षाच्या समर्थकांमध्ये बहुतकरून तरुणांचाच समावेश असल्याचेही समोर आले आहे.
पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी शाहबाझ शरीफ ( पीएमएल -एन) इम्रान खान (पीटीआय) आणि बिलावल भुत्तो (पीपीपी) हे नेते रिंगणात आहेत. नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर सत्तासूत्रे हाती घेणाऱ्या शाहबाझ शरीफ यांनी आपल्या उत्तम प्रशासकीय कौशल्याची चुणूक दाखवली. मात्र त्यांचे नेतृत्व तितकेसे प्रभावी नाही. तर बिलावल भुत्तो राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे इम्रान खान याचेच या निवडणुकीत पारडे जर राहण्याची शक्यता आहे.
सर्व्हेनुसार 2013 साली झालेल्या निवडणुकीत इम्रान खानच्या पक्षाला मतदान करणाऱ्या मतदारांपैकी 83.07 टक्के मतरादांनी यावेळी इम्रान खानचा पक्षच निवडणुकीत विजयी होईल, असे सांगितले. तर 2013 साली पीएमएल-एन या पक्षाला मत देणाऱ्या मतदारांपैकीही सुमारे 40.92 टक्के मतदारांनी यावेळी पीटीआयच निवडणुक जिंकेल असे सांगितले.