सू की यांनी जिंकल्या संसदेत २/३ जागा

By admin | Published: November 14, 2015 01:21 AM2015-11-14T01:21:40+5:302015-11-14T01:21:40+5:30

गेल्या रविवारी येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये होणारा हा सत्ताबदल ऐतिहासिक म्हणवला जात आहे.

Suu Kyi won 2/3 seats in Parliament | सू की यांनी जिंकल्या संसदेत २/३ जागा

सू की यांनी जिंकल्या संसदेत २/३ जागा

Next

यंगून : गेल्या रविवारी येथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. त्यामुळे म्यानमारमध्ये होणारा हा सत्ताबदल ऐतिहासिक म्हणवला जात आहे.
१९९० नंतर सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाची ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त जागा सू की यांच्या पक्षाला मिळाल्या. म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता होती; पण आता लोकनियुक्त सरकार येत असून या सरकारला अध्यक्ष निवडण्याची आणि सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे.
निवडणूक आयोगाने हळूहळू सर्व निकाल जाहीर केले. त्यात सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी या पक्षाला मिळाले.
या पक्षाने आतापर्यंत ३४८ जागा जिंकल्या असून, आणखी बरेच निकाल जाहीर व्हायचे आहेत. या बहुमताने सू की यांना संसदेच्या दोन्ही सभागृहावर नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे हाच पक्ष नवीन अध्यक्ष निवडू शकतो आणि सरकारही स्थापन करू शकतो.
या निवडणुकीमुळे देशाचे राजकीय चित्र बदलले असून, विद्यमान अध्यक्षांनी सू की यांच्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
या निवडणुकीत लष्कर शांत राहिले. सू की यांना सत्ता मिळाली असली तरीही लष्कराच्या हाती आणखी व्यापक अधिकार आहेत. लष्कराने तयार केलेल्या घटनेनुसार सू की अध्यक्ष होऊ शकत नाहीत, शिवाय संसदेतील २५ टक्के जागांवर नियुक्त्या करण्याचा लष्कराला अधिकार आहे.
या स्थितीत ‘अध्यक्षांपेक्षा वरचे स्थान’ घेऊन शासन चालविण्याचा संकल्प सू की यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. घटनेत सू की यांना अध्यक्ष होण्यापासून रोखण्यात आले असले तरीही त्यावर आपण तोडगा काढू, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने सू की यांच्या विजयाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

Web Title: Suu Kyi won 2/3 seats in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.