स्वा. सावरकरांचे स्मरण मोदी करणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 03:30 PM2017-07-05T15:30:11+5:302017-07-05T15:40:11+5:30

आज नरेंद्र मोदी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या स्वा. सावरकरांचे स्मरण आपल्या भाषणात करतात का हाच औत्सुक्याचा मुद्दा आहे.

SW Will Modi be reminded of Savarkar? | स्वा. सावरकरांचे स्मरण मोदी करणार का ?

स्वा. सावरकरांचे स्मरण मोदी करणार का ?

Next

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी इस्रायलच्या संकल्पनेला आणि नंतर ज्यूंच्या या स्वतंत्र देशाला उघड पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे संघ परिवारातील नाना पालकर यांनी ज्यू धर्मावरील सखोल अभ्यासासह इस्रायली जनतेचे परिश्रम इस्रायल छळाकडून बळाकडे या पुस्तकात मांडले होते. आज नरेंद्र मोदी या दोघांच्या कार्याचे स्मरण आपल्या भाषणात करतात का हाच औत्सुक्याचा मुद्दा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी इस्रायलला गेले आहेत. दोन्ही देशांना स्वातंत्र्य मिळून 7 दशके झाली आहेत. 1992 पासून या दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित झाले आहेत. तत्पुर्वी दोन्ही देशांमध्ये फारसे उघड राजकीय संबंध नव्हते. नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान असा सन्मान मिळवला आहेच त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
 
1948 साली इस्रायलची निर्मिती झाली. त्यापुर्वीच 1947 च्या डिसेंबर महिन्यात स्वा. सावरकरांनी इस्रायलच्या स्थापनेसाठी ज्यूंनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलेले आहे. "इस्रायलच्या निर्मितीला जगातील बहुतेक देश पाठिंबा देत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. ज्या दिवशी इस्रायल प्रत्यक्षात येईल तो दिवस ज्यूंसाठी मोठा ऐतिहासिक असेल. ज्यादिवशी मोझेस ज्यूंची इजिप्तच्या तावडीतून मुक्तता करुन त्यांच्या प्रॉमिस्ड लॅंडपर्यंत नेले त्या दिवसाचीच या घटनेची तुलना केली पाहिजे असं मला वाटतं.", असं लिहून सावरकरांनी युनोमध्ये भारताने सुरुवातीच्या काळात इस्रायलला केलेल्या विरोधाबद्दल दुःखही व्यक्त केलं. "भारतामध्ये अल्पसंख्यांक असणाऱ्या ज्यूंच्या उत्तम वर्तनामुळे त्यांच्यावर कधीही शंका घेण्यास वाव नव्हता", असेही सावरकरांनी लिहून ठेवले आहे. 
 
इस्रायल आणि ज्यूंचे स्वतंत्र राज्य असावे यासाठी सावरकरांनी पाठिंबा दिला असला तरी युरोपातील निर्वासित ज्यूंच्या वसाहती भारतात करण्यास त्यांनी ठाम विरोध केला होता.त्याचप्रमाणे रा. स्व. संघाचे नारायण हरी पालकर म्हणजेच नाना पालकर यांनीही इस्रायलच्या जन्मापासून विकासाच्या सर्व टप्प्यांचा अभ्यास केला होता आणि पुस्तकाचे लेखन केले होते. त्यांच्या स्मृतीसाठी इस्रायलमध्ये एक रस्तादेखिल आहे. नरेंद्र मोदी आपल्या विचारांची मुळे ज्या नेत्यांच्या विचारांमध्ये आहेत असे म्हणतात त्यांचा उल्लेख करण्याची मोदींना संधी आहे.
 
मोदींच्या इस्रायल दौ-यानिमित्ताने मुंबईच्या ज्यू महापौरांचे स्मरण...
 
योनाथन नेत्यानाहूंची काढली आठवण
काल इस्रायलमध्ये पोहोचल्यावर झालेल्या स्वागताच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी योनाथन नेत्यानाहू यांची आठवण काढली. इस्रायलचे सध्याचे पंतप्रधान बेंजामिन यांचे ते भाऊ होते. ऑपरेशन एन्टेबीमध्ये अतिरेक्यांच्या तावडीतून युगांडातून इस्रायली नागरिकांना सोडवून आणताना योनाथन यांचा मृत्यू झाला होता. 4 जुलै रोजीच ही घटना घडली असल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हा उल्लेख केला.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्याबाबत अधिक वाचा-
इस्रायली शहराच्या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी दिले होते बलिदान
"आपका स्वागत है मेरे दोस्त", मोदींचं इस्त्रायलमध्ये हिंदीत स्वागत
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी बेने इस्रायली समुदाय उत्सुक
 
अहमदिया पंथाच्या नेत्याने मानले आभार
इस्रायलमध्ये स्वागताच्यावेळेस पंतप्रधान मोदींनी इस्रायली मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळेस त्यांना विविध धार्मिक नेतेही भेटले. तेव्हा अहमदिया पंथाचे नेते मोहम्मद शरिफही भेटले. त्यांनी भारतात आपण आमच्या पंथाला मदत केल्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांना धन्यवाद दिले. तुम्ही भारतामध्ये इतिहास घडवाल अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यावर पंतप्रधान मोदी यांनी दिलखुलास हसून त्यांचे आभार मानले. या काही क्षणांच्या चर्चेमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू देखिल सहभागी झाले.

 

Web Title: SW Will Modi be reminded of Savarkar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.