जगप्रसिद्ध डीजे एविचीचं अवघ्या २८ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2018 08:26 AM2018-04-21T08:26:23+5:302018-04-21T08:26:23+5:30
मस्कतमध्ये घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण अस्पष्ट
प्रसिद्ध स्वीडिश डीजे अविचीचं निधन झालं आहे. ओमानची राजधानी मस्कतमध्ये त्यानं वयाच्या 28 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अविचीच्या जनसंपर्क प्रमुख असलेल्या डायन बेरॉन यांनी मृत्यूची माहिती दिली. 'आपल्याला कळवताना अतिशय दु:ख होतंय की, टिम बर्गलिंग, ज्यांना आपण डीजे अविची नावानं ओळखतो, ते आता आपल्यात नाहीत,' असं बेरॉन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.
अविचीच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. डीजे अविचीला इलेक्ट्रॉनिक म्युझिकसाठी ओळखलं जातं. स्वीडनमध्ये जन्मलेला अविची डीजे सोबतच निर्मातादेखील होता. त्यानं दोन एमटीव्ही पुरस्कार, एक बिलबोर्ड म्युझिक पुरस्कार पटकावले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या एका अल्बमला बिलबोर्ड म्युझिक पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं.
वेक मी अप, द डेज, यी मेक मी ही त्याची गाणी लोकप्रिय ठरली होती. 2013 मध्ये वेक मी अप गाण्यानं ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातला होता. हे गाणं त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. अति मद्यपान केल्यानं अविचीला पोटासंबंधी आजार झाले होते. 2014 मध्ये अविचीवर शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर अविचीनं प्रवास करणं कमी केलं आणि स्टुडिओमध्ये बसून काम करण्यास प्राधान्य दिलं.