व्यवहार न झालेल्या खात्यांचा तपशील जाहीर करणार स्वीस बँक
By admin | Published: October 4, 2015 11:41 PM2015-10-04T23:41:32+5:302015-10-04T23:41:32+5:30
भारतासहित इतर देशांच्या व्यक्तींची अशी अनेक बँक खाती आहेत ज्यावर ६० वर्षांत व्यवहारच झाला नाही. अशा बँक खात्यांची माहिती स्वीस बँक डिसेंबरमध्ये देणार आहे.
झ्युरीच : भारतासहित इतर देशांच्या व्यक्तींची अशी अनेक बँक खाती आहेत ज्यावर ६० वर्षांत व्यवहारच झाला नाही. अशा बँक खात्यांची माहिती स्वीस बँक डिसेंबरमध्ये देणार आहे.
स्वीस बँक प्रथमच अशा प्रकारची माहिती देत असून, १९५५ पासून व्यवहार न झालेली अशी अनेक खाती आहेत. त्या खातेदारांशी संपर्क साधण्यातही आतापर्यंत स्वीस बँकेला यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर अशा खातेदारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. यात भारतासहित अन्य देशांंतील खात्यांचा समावेश आहे.
याबाबत असे तर्कवितर्क केले जात आहेत की, तत्कालिक राजा-महाराजांचीही यात खाती असू शकतात. ज्यांनी आपल्या खात्यामध्ये वारसदारांचा उल्लेख केलेला नाही. परिणामी, ही रक्कम पडून आहे. काही कथित वारसदारांनी या खात्यांबाबत दावा केला होता; परंतु हे वारसदार सबळ पुरावे देऊ शकले नाहीत.
तथापि, स्वीस बँकेने अद्यापपर्यंत अशा कुठल्याही खातेदाराचे अथवा देशाचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. स्वीस बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे की, या यादीमध्ये काही भारतीय नागरिकांची नावे आहेत. मात्र, डिसेंबर २०१५ मध्ये पूर्ण यादीच प्रसिद्ध केली जाणार असून, त्यासोबत भारतीयांची नावेही प्रसिद्ध होतील, असे या अधिकाऱ्याने सांगितले. यादी प्रसिद्ध करताना खातेदाराचे प्रथम नाव, आडनाव, जन्मतारीख, राष्ट्रीयत्व याचा समावेश असेल, असे सांगण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
स्वीस बँकेने यावर्षी नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार जी खाती ६० वर्षांपासून बंद आहेत त्यांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तथापि, त्यानंतर आलेल्या दाव्यांमध्ये नियमांनुसार तथ्य आढळले नाही तर ही संपत्ती स्वीस संघाकडे हस्तांतरित करण्यात येईल.