स्विस बँका नरमल्या; काळा पैसा ठेवणाऱ्यांची दिली यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 08:26 AM2019-05-27T08:26:49+5:302019-05-27T08:27:13+5:30
स्वित्झरलँडच्या प्रशासनाने त्यांच्या बँकांची विश्वासार्हता आणि प्रतिमा पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे.
काळ्या पैशांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या स्विस बँकांनीनरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच त्यांच्या भारतीय खातेदारांची यादी सोपविली आहे. गेल्या आठवड्यात 12 जणांची नावे आणि त्यांची माहिती या बँकांनी भारताला दिली असून या व्यक्तींना नोटीसाही पाठविण्यात आल्या आहेत.
स्वित्झरलँडच्या प्रशासनाने त्यांच्या बँकांची विश्वासार्हता आणि प्रतिमा पुन्हा मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे त्यांनी त्यांच्या बँकांमध्ये खातेधारकाविषयीची गोपनियता ठेवण्याच्या भूमिकेला बगल दिली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून जवळपास 25 नागरिकांना स्विस बँकांनी नोटीसा पाठविल्या आहेत. तसेच भारताला त्याची माहिती देण्यासंबंधी अपील करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी स्विस बँकांमधील काळा पैसा भारतात परत आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार, अशी लोकप्रिय झालेली घोषणा केली होती. मात्र, गेल्या 5 वर्षांत स्विस बँकांनी केवळ काही कोटींच्या ठेवी असलेली नावेच जाहीर केली होती. यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या मोदींच्या प्रयत्नांवर पाणी फेरले होते.
या नागरिकांच्या नावांचे पहिले अक्षर आणि त्यांची जन्मतारीख स्विस सरकारने जाहीर केली आहेत. श्रीमती एएसबीके (जन्म-24 नोव्हेंबर, 1944), एबीकेआय (9 जुलै,1944), श्रीमती पीएएस (जन्म-2 नोव्हेंबर, 1983), श्रीमती आरएएस (22 नोव्हेंबर, 1973), एपीएस (जन्म-27 नोव्हेंबर, 1944), श्रीमती एडीएस (जन्म-14 ऑगस्ट, 1949), एमएलए (जन्म-20 मे, 1935), एनएमए (जन्म-21 फेब्रुवारी, 1968) आणि एमएमए (27 जून, 1973) या नावांचा समावेश आहे.
या सर्वांना नोटीस पाठवून त्यांचा प्रतिनिधी किंवा त्यांनी अपील करण्यास सांगितले आहे. तसेच 7 मे रोजी रतन सिंह चौधरी यांना दहा दिवसांत अपील करण्यास सांगतले गेले होते. याशिवाय श्रीमती जेएनवी यांच्यासह कुलदीप सिंह ढींगरा आणि अनिल भारद्वाज यांना एप्रिलमध्ये नोटीस पाठविण्यात आली होती.
मुंबईतील तिघांची चौकशी सुरु
मार्चमध्येही स्विस बँकांनी मुंबईतील जियोडेसिक लिमिटेड आणि त्यांच्या तीन संचालकांना नोटीस पाठिवली होती. याप्रकरणी प्रशांत शरद मुऴेकर, पंकज कुमार ओंकार श्रीवास्तव आणि किरण कुलकर्णी यांची चौकशी सुरु करण्य़ात आली आहे.