'भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेते की'... न्यूयॉर्कच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी भारतीय महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 01:39 PM2019-01-14T13:39:36+5:302019-01-14T13:45:17+5:30
नवी दिल्ली - मूळच्या अहमदाबाद येथील उशीर पंडित दुरांत यांची न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
नवी दिल्ली - मूळच्या अहमदाबाद येथील उशीर पंडित दुरांत यांची न्यूयॉर्क राज्याच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उशीर या 11 वर्षाच्या असताना त्यांच्या कुटुंबीयांनी अमेरिकेत स्थलांतर केले. त्यामुळे उशीर यांचे वकिली शिक्षणही अमेरिकेतच झाले. कधी काळी इंग्रजीचा गंधही नसलेल्या उशीर यांच्या या नियुक्तीनंतर त्यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
न्यूयॉर्क लॉ स्कूलमधून उशीर यांनी कायद्याचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, उशीर यांनी तेथील क्वीन्स जिल्ह्यात सरकारी वकिल म्हणून नोकरीला सुरुवात केली. वकिली क्षेत्रात 15 वर्षे सेवा केल्यानंतर क्वीन्स जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून 2015 साली त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, केवळ चारच वर्षात उशीर यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाल्यानंतर शपथ घेताना उशीर यांनी भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. मी भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेते की.... असे म्हणत उशीर यांनी आपला कार्यभार स्वीकारला.
दरम्यान, अमेरिकेत गेल्यानंतर सुरुवातीला इंग्रजी शिकण्यासाठी उशीर यांना खूप मेहनत घ्यावी लागली. मात्र, त्यांनी प्रत्येक बाब बारकाईने शिकत इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले. तेव्हापासून उशीर यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यामुळे, आता पुढील 14 वर्षे उशीर पंडित या न्यूयॉर्क सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत.