सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानी दमास्कसकडे आगेकूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 18:40 IST2024-12-06T18:31:15+5:302024-12-06T18:40:45+5:30
Syria crisis, Homs City Captured : मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे

सीरियातील संघर्ष वाढला! आणखी एक शहर बंडखोरांच्या ताब्यात; आता राजधानी दमास्कसकडे आगेकूच
Syria crisis, Homs City Captured : सीरियातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी बंडखोरांनी सीरियातील तिसऱ्या शहरावर ताबा मिळवला. होम्स या शहरात बंडखोर पोहोचलेअसून एका अहवालानुसार, बंडखोर गट हयात तहरीर अल शाम (HTS) ने अलेप्पो आणि हमा या दोन मोक्याच्या शहरांवरही कब्जा केला आहे. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सचे (SOHR) प्रमुख रामी अब्देल रहमान यांनी सांगितले की, रस्तान आणि तालबिसेह ताब्यात घेतल्यानंतर HTS आणि त्यांचा सहकारी गट होम्स शहराच्या बाहेरील भागापासून पाच किलोमीटरवर पोहोचला होता. अखेर त्यांनी होम्सचा ताबा मिळवला असून आता बंडखोर सैनिक देशाची राजधानी असलेल्या दमास्कसच्या दिशेने आगेकूच करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, होम्स शहराचा ताबा घेतल्याने बंडखोर सैनिकांना सीरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता रोखणे सोपे झाले आहे. सिरियन किनारपट्टीचा मुख्य रस्ता हा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या अलावाइट गटाचा गड मानला जातो. सीरियाचे होम्स शहर हमाच्या दक्षिणेस आहे. सुमारे १० दिवसांत, HTS आणि सहयोगी सैनिकांनी सीरियाची प्रमुख सामरिक शहरे मानली जाणारी अलेप्पो आणि हमा ही शहरे ताब्यात घेतली. दुसरीकडे बशर सरकारला वाचवण्यासाठी रशियन सैन्य मैदानात उतरले आहे. रशियन सेंटरचे उपप्रमुख ओलेग इग्नासिक यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत रशियन आणि सीरियन हवाई दलांनी संयुक्तपणे मिलिशियाच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात किमान ३०० बंडखोर ठार झाले आहेत.
अल अरेबिया न्यूजनुसार, रशियन सैन्याने हमा आणि होम्स शहरांना जोडणाऱ्या अल-रस्तान पुलावर मोठा रॉकेट हल्ला केला आहे. SOHR ने देखील हा पूल नष्ट झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच, सीरिया सीमेवरही हिजबुल्लाहचेच हल्ले सुरु आहेत. दोन वरिष्ठ लेबनीज सुरक्षा सूत्रांनी वृत्तसंस्थे रॉयटर्सला सांगितले की, हेजबुल्लाहने सरकारविरोधी लढवय्यांना होम्सचे मोक्याचे शहर काबीज करण्यापासून रोखण्यासाठी रात्रभर लेबनॉनमधून काही सैनिकांना सीरियात तैनात केले आहे.