सीरियन स्थलांतरितांच्या लोंढ्याचा म्युनिकवर आला ताण
By admin | Published: September 14, 2015 01:39 AM2015-09-14T01:39:42+5:302015-09-14T01:39:42+5:30
जर्मनीने जरी स्थलांतरितांसाठी दारे उघडली असली तरी आता मात्र या लोंढ्यांचा जर्मन शहरांवर ताण येत आहे. जर्मनीच्या दक्षिणेस असणाऱ्या म्युनिक शहरामध्ये शनिवारी १३ हजार स्थलांतरित येऊन थडकले आहेत
म्युनिक : जर्मनीने जरी स्थलांतरितांसाठी दारे उघडली असली तरी आता मात्र या लोंढ्यांचा जर्मन शहरांवर ताण येत आहे. जर्मनीच्या दक्षिणेस असणाऱ्या म्युनिक शहरामध्ये शनिवारी १३ हजार स्थलांतरित येऊन थडकले आहेत. त्यामुळे बदलत्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यायचे, असा प्रश्न प्रशासकांना पडला आहे.
जर्मनीचा बव्हेरिया प्रांत पूर्व युरोपातील देशांना लागून आहे. त्यामुळे हंगेरीतून आॅस्ट्रियामार्गे येणाऱ्या रेल्वे म्युनिक शहरापर्यंत येतात. या रेल्वे आणि रस्ते मार्गांवरून हजारो लोक म्युनिचमध्ये येऊन थडकत आहेत. अप्पर बव्हेरिया प्रांताचे अध्यक्ष ख्रिस्तोफ हिलनबँड यांनी आता या परिस्थितीत कसे सहकार्य करायचे, हा प्रश्न समोर असल्याचे मान्य केले आणि म्युनिक लवकरच कोसळून पडेल, अशी भीतीही व्यक्त केली.
प्रतिदिन जर इतक्या संख्येने लोक येऊ लागले तर शहराचे चलनवलन थांबेल, असे संकेत आधीही अनेक नागरिकांनी दिले होते. मागील आठवड्याच्या शेवटी २० हजार लोकांनी म्युनिचमध्ये प्रवेश केला होता.
बव्हेरियातील टीव्ही चॅनेल बीआरने तर म्युनिक हे आता मानवनिर्मित संकटाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे या स्थितीचे वर्णन केले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये झालेले हे सर्वात मोठे स्थलांतर आहे. त्यामुळे युरोपियन युनियनचे २८ सदस्य देश या प्रश्नामुळे चिंतेत पडले आहेत.
युरोपियन कमिशनने दिलेल्या प्रस्तावात १ लाख ६० हजार लोकांना विविध देशांनी वाटून घ्यावे असे म्हटले होते. मात्र त्यालाही काही देशांनी विरोध केला आहे. झेक रिपब्लिक, स्लोव्हाकिया, रुमानिया यांनी यास स्पष्ट नकार दिला आहे. हंगेरीमध्ये या प्रश्नामुळे सर्वात जास्त तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हंगेरी हा जर्मनीच्या वाटेवरील देश असल्यामुळे स्थलांतरित या देशात प्रवेश करतात. हंगेरीच्या आकडेवारीनुसार एका वर्षभरात १ लाख ८० हजार लोक हंगेरीमध्ये घुसले आहेत. या लोकांना रोखण्यासाठी हंगेरीने पोलीस, लष्कराचा वापरही करुन पाहिला आहे.
आता थांबण्याची गरज....
म्युनिक शहरामध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर तेथील पोलीस प्रवक्त्याने चिंता व्यक्त केली आहे. या लोंढ्यांकडे पाहून लवकरच स्थलांतराची शेवटची मर्यादा येऊ शकते, असे त्याने मत व्यक्त केले आहे.