इसिसबरोबर लढाई राहिली बाजूला, इथे अमेरिका आणि रशियाच्याच फायटर विमानांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 02:42 PM2017-12-15T14:42:05+5:302017-12-15T15:25:50+5:30
आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात.
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. राजकीय कुरघोडीतून अनेकदा अमेरिका आणि रशिया परस्परांना दमबाजीही करत असतात. गुरुवारी सीरियाच्या आकाशात या दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. सध्या सीरियामध्ये अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश सक्रिय असून तिथे इसिस विरोधात लढाई लढत आहेत.
गुरुवारी अमेरिकेच्या दोन फायटर विमानांनी इसिस विरोधातील जमिनीवरील कारवाईला मदत करण्याऐवजी रशियन फायटर विमानांचा पाठलाग केला. आम्ही सक्रिय असलेल्या भूप्रदेशात रशियन फायटर विमाने घुसल्यामुळे पाठलाग करावा लागला असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या एफ-22 स्टेल्थ फायटर जेटने रशियाच्या एसयू-25 विमानाला धोक्याचा इशाराही दिला.
ही विमाने इतकी जवळ आली होती कि, एसयू-25 बरोबर हवेतील टक्कर टाळण्यासाठी एफ-22 फायटर जेटच्या वैमानिकाला हवाई कसरतीचे कौशल्य दाखवावे लागले. जवळपास 40 मिनिटे हा संघर्ष सुरु होता. इसिस विरोधात जमिनीवर लढणा-या फौजांना अमेरिकेची एफ-22 रॅप्टर विमाने मदत करत होती. त्याचवेळी हा संघर्ष झाला असे एअर फोर्सच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल डॅमियन पिकआर्ट यांनी सांगितले.
हवाई कसरतींमधून एफ-22 रॅप्टरच्या वैमानिकाने एसयू-25 ला संघर्ष टाळण्याचे संकेत दिले. अमेरिका आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार रशियन फायटर विमाने युफ्रेटस नदीच्या पूर्वेच्या दिशेला येणार नाहीत आणि अमेरिकेची फायटर विमाने पश्चिमेला जाणार नाहीत. रशियाची विमाने अमेरिकेचे नियंत्रण असलेल्या प्रदेशात दिवसाला सहा ते आठवेळा येतात त्यामुळे हा संघर्ष अधिक भडकू शकतो असे अमेरिकेचे म्हणणे आहे. रशियाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.