हल्ल्यात सीरियातील रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:58 AM2018-04-15T05:58:58+5:302018-04-15T05:58:58+5:30
ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी केला आहे.
दमास्कस : ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या संयुक्त आघाडीने शनिवारी पहाटे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सीरिया सरकारचा रासायनिक शस्त्रांचा बहुतांश साठा नष्ट झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जीन व्येव्स ले द्रियान यांनी केला आहे. ट्रम्प यांनी आमची मोहीम फत्ते झाल्याचे म्हटले
आहे. मात्र, अमेरिका व त्याच्य मित्र राष्ट्रांची बहुतांशी क्षेपणास्त्रे आम्ही हवेतच नष्ट केली, असा सीरियाचा दावा आहे.
जीन व्येव्स ले द्रियान यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गेल्या आठवड्यात बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या डुमा शहरात ४० हून अधिक स्त्रिया व मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला विषारी वायूचा हल्ला सीरियाच्या बशर अल असद सरकारनेच केला होता, याचे ठाम पुरावे फ्रान्सकडे आहेत.
रासायनिक अस्त्रांबाबतची धोक्याची रेषा सीरियाने ओलांडल्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. ती पुन्हा ओलांडली, तर पुन्हा हल्ले करू, असे सांगून ते म्हणाले की, असद शासनाने यावरून धडा घेतला असावा. त्यामुळे पुन्हा हल्ल्याची गरज पडणार नाही, अशी आपणास आशा आहे. (वृत्तसंस्था)