सिरिया शांततेचा मार्ग सुकर
By admin | Published: December 20, 2015 12:03 AM2015-12-20T00:03:08+5:302015-12-20T00:03:08+5:30
सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली.
संयुक्त राष्ट्रे : सिरियातील सरकार व विरोधी पक्षांबरोबर चर्चा करून तेथील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शांतता प्रक्रिया ठरावाला शनिवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एकमताने मंजुरी दिली. तथापि, गुंतागुतीचे विषय विशेषत: अध्यक्ष बशर अल असद यांची काय भूमिका असेल याचा उल्लेख ठरावात नाही.
सिरियात संघर्ष सुरू झाल्यापासून सुरक्षा समितीत याबाबतचा हा पहिलाच ठराव आहे. ठरावात म्हटले आहे की, सिरियातील युद्ध संपुष्टात यावे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ प्रमुख बान की मून यांनी पुढील महिन्यात २०१२ च्या जिनिव्हा करारानुसार त्या देशातील सरकार व विरोधी पक्षांची बैठक बोलवावी. जेणेकरून तेथील संघर्षावर तोडगा काढला जाईल. सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतीने राजकीय प्रक्रिया सुरू केली जाईल व येत्या सहा महिन्यांत तेथे विश्वासार्ह, वंशभेदरहित, सर्वसमावेशक अशी राजकीय व्यवस्था प्रस्थापित केली जाईल. तसेच नवी राज्यघटना तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. त्यानंतर दीड वर्षाच्या कालावधीत सिरियात संयुक्त राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली निवडणुका होतील. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले की, सिरियातील निरपराध लोकांची कत्तल त्वरित थांबली पाहिजे, असा संदेश हे जागतिक व्यासपीठ या ठरावातून देऊ इच्छित आहे. तेथे लोकनियुक्त सरकार स्थापन झाले पाहिजे व त्यासाठी आवश्यक ती राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. (वृत्तसंस्था)