"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:19 PM2024-11-21T22:19:29+5:302024-11-21T22:20:13+5:30
PM Modi Guyana Visit: "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (21 नोव्हेंबर) गयाना येथे संसदेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, गयाना आणि भारताची मैत्री खूप जुनी आहे. 180 वर्षांपूर्वी भारतीयांनी या भूमीवर पाऊल ठेवले. दोघांनीही स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. येथे गांधीजींच्या जवळच्या लोकांनी एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि स्वातंत्र्य मिळवले. आज आपण दोन्ही देश लोकशाही मजबूत करत आहोत.
मोदी पुढे म्हणाले, "गयानामध्ये लोकशाही बळकट करण्याचा प्रत्येक प्रयत्न जगाला बळकट करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची आव्हाने वेगळी होती आणि आज २१व्या शतकातील आव्हाने वेगळी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था आणि संस्था कोलमडत आहेत. कोरोनानंतर जगाने एका नव्या जागतिक व्यवस्थेकडे वाटचाल करायला हवी होती. मात्र आज जग काही इतर गोष्टींमध्येच अडकले आहे. जर आपण मानवता प्रथम या भावनेने काम केले तर आपण मानवतेसाठी कार्य करण्यास कटिबद्ध राहू."
आपण प्रत्येक चढ-उतारावर लोकशाही मजबूत करत आहोत आणि लोकशाहीपेक्षा मोठे कुठलेही माध्यम नाही. लोकशाही प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क प्रदान करते आणि त्याच्या उज्वल भविष्यासाठी कामना करते.
'भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडतोय' -
पीएम मोदी म्हणाले, "भारत आणि गयानाचे नाते अत्यंत घनिष्ठ आहे, ते मातीचे, घामाचे आणि मेहनतीचे नाते आहे. सुमारे 180 वर्षांपूर्वी एक भारतीय गयानाच्या भूमीवर आला. तेव्हापासून आनंद आणि दु:ख्खाच्या क्षणी भारत आणि गयाना यांच्यातील संबंध आत्मीयतेने भरलेले आहेत. लोकशाही प्रथम, मानवता प्रथम या भावनेने भारत एक 'विश्व बंधू' म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहे.