पाकिस्तानच्या विजयानंतर पाक चाहते 'सैराट', हवेत गोळीबार करताना 12 लोक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:26 PM2021-10-25T18:26:05+5:302021-10-25T18:26:37+5:30
T20 World Cup 2021:टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.
कराची: टी-20 विश्वचषकात रविवारी रात्री झालेल्या सामन्यात पाकिस्ताननेभारताचा पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानात जल्लोषाचे वातावरण होते. भारताविरोधातील विजय हा पाकिस्तानसाठी खूप मोठी गोष्ट आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, कराची, रावळपिंडीसारख्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिक जल्लोष करत होते. पण, यावेळी कराचीत एक मोठी घटना घढली. या जल्लोषादरम्यान हवेत गोळीबार करत असताना 12 जण जखमी झाले आहेत. यात एका पोलिसाचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कराचीच्या ओरंगी टाऊनच्या सेक्टर-4 आणि 4K चौरंगीमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. तर, गुलशन-ए-इक्बाल येथे झालेल्या गोळीबारात एका पोलिसालाही गोळी लागली आहे. सचल गोठ, ओरंगी टाऊन, न्यू कराची, गुलशन-ए-इक्बाल आणि मालीर या विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात 12 जण जखमी झाले आहेत.
टी-20 विश्वचषक सामन्यात काय झालं ?
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 151/7 धावा केल्या. कर्णधार कोहलीने 57 धावांची खेळी खेळली. तर, पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने 3, हसन अलीने दोन आणि हाफीज-रौफने प्रत्येकी 1 विकेट घेऊन भारताच्या टॉप ऑर्डरला माघारी पाठवले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 152 धावाचे लक्ष गाठले.