चांद्रवारीचे ‘टीए बिल’ फक्त ३३ डॉलरचे!
By admin | Published: August 5, 2015 02:20 AM2015-08-05T02:20:12+5:302015-08-05T02:20:12+5:30
सेहेचाळीस वर्षांपूर्वी अपोलो-११ यानाने चंद्रावर जाऊन तेथे चालणारा दुसरा मानव म्हणून ख्यातकीर्त झालेले अमेरिकेचे अंतराळवीर कर्नल एडविन ई. एल्ड्रिन (बझ एल्ड्रिन)
लंडन : सेहेचाळीस वर्षांपूर्वी अपोलो-११ यानाने चंद्रावर जाऊन तेथे चालणारा दुसरा मानव म्हणून ख्यातकीर्त झालेले अमेरिकेचे अंतराळवीर कर्नल एडविन ई. एल्ड्रिन (बझ एल्ड्रिन) यांना त्या ऐतिहासिक चांद्रवारीसाठी ‘नासा’कडून अधिकृत प्रवासखर्च म्हणून फक्त ३३.३१ डॉलर एवढी रक्कम दिली गेली होती!
आज ८५ वर्षांचे असलेल्या एल्ड्रिन यांनी सप्टेंबर १९६९मध्ये ‘नासा’कडे भरून दिलेले त्या चांद्रसफरीचे ‘ट्रॅव्हल व्हाउचर’ सोमवारी रात्री टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केले. त्या ‘ट्रॅव्हल व्हाउचर’मध्ये एल्ड्रिन यांनी टेक्सासमधील ह्युस्टनपासून चंद्रापर्यंतच्या आणि परतीच्या प्रवासाचा ३३.३१ डॉलरचा खर्च नमूद केला आहे.
या व्हाउचरमध्ये प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याचा खर्च तपशीलवार दिलेला असून, वापरण्यात आलेल्या विविध वाहनांमध्ये ‘सरकारी अंतराळयाना’चाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रवासात सरकारकडून भोजन आणि निवासाची सोय करण्यात आल्याचीही त्यात नोंद आहे!
अर्थात यात नोंद केलेला खर्च विविध विमानतळांवर येण्या-जाण्यासाठी केलेल्या प्रवासाचा असावा व त्यात अर्थातच खुद्द ‘अपोलो-११’ अंतराळयानाचा खर्च धरलेला नाही, हे उघड आहे.
एल्ड्रिन यांनी त्या चांद्रसफरीशी संबंधित दुर्मीळ दस्तावेज टिष्ट्वटरवर टाकला. ‘अपोलो-११’च्या तिन्ही अंतराळवीरांकडून हवाई बेटांवरील होनोलुलू विमानतळावर परत आल्यानंतर कस्टम्स अधिकाऱ्याने भरून घेतलेला फॉर्म आहे.
हे अंतराळवीर ‘अपोलो-११’ यानाने केप केनेडी, ह्युस्टन येथून निघून चंद्रावर जाऊन होनोलुलू येथे २४ जुलै १९६९ रोजी परत आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
येताना त्यांनी चंद्रावरील दगड आणि माती आणल्याची नोंद ‘सोबत आणलेल्या सामाना’च्या रकान्यात केली गेली आहे. प्रवासात या अंतराळवीरांना ज्याचा प्रसार होऊ शकेल असा काही रोग किंवा आजार झाला होता का? या रकान्यात ‘अद्याप निदान व्हायचे आहे!’ असे नमूद केले गेले आहे.