बेड जोरात हलला अन् थरकाप उडाला, तैवानमधील भारतीय तरुणाने ‘लोकमत’ला सांगितला थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:31 AM2024-04-04T06:31:25+5:302024-04-04T06:31:59+5:30
Taiwan Earthquake: तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले
- कौस्तुभ महाजनी
हुआलिन (तैवान) - तैवानला लहान-मोठ्या भूकंपांची सवय आहे. मात्र, बुधवारी सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी जाणवलेला भूकंपाचा धक्का मोठा होता. खिडक्या जोरात हलल्या आणि बेड जोरजोरात हलू लागला. यामुळे झोप उडाली. उठून पाहतो तर मोठा भूकंप होत असल्याचे लक्षात आले अन् अंगावर काटा आला. असा भूकंप प्रथमच अनुभवत होतो.
६ वर्षांपासून तैवानमध्ये राहात असल्याने भूकंप ही येथे काही नवीन गोष्ट नाही. दर महिन्याला किमान ४ ते ५ रिक्टर स्केलचे अनेक धक्के बसत असतात. मात्र, बुधवारी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जे हादरे बसत होते तेव्हा ते प्रचंड होते. काही क्षण काय करायचे तेच कळाले नाही. सकाळी ८ ते दुपारपर्यंत अनेक लहान-मोठे धक्के जाणवत होते.
नवीन तैपेईमध्ये २४ व्या मजल्यावर मी राहतो. ७.४ रिक्टर स्केल भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे ३५ किलोमीटर खोल होता.
...म्हणून जास्त नुकसान नाही
- याआधी ६ वर्षांत येथे भूकंपाचे खूप धक्के मी अनुभवले. मात्र, हा १९९९ नंतरचा ७ रिक्टर स्केलचा भूकंप होता. त्यामुळे थरकाप उडाला.
-हुआलियन शहरात अनेक घरे पडली, मात्र तैवानच्या सैन्य आणि आपत्ती प्रतिबंध विभागाने तत्काळ मदत करत लोकांचा
जीव वाचवला.
केवळ १ तासात सर्वकाही सुरू
तैवानला नियमितपणे भूकंपाचा धक्का बसत असल्याने सुरक्षिततेसाठी जगातील सर्वांत प्रगत सुसज्जता येथे आहे. परंतु, बुधवारचा भूकंप इतका तीव्र होता की भूकंपांची सवय झालेले नागरिकही भयभीत झाले. लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक अवघ्या ३० ते ६० मिनिटांच्या तपासणीनंतर पुन्हा सुरू झाली. सध्या इमारतींचे नुकसान झालेल्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. त्यांना योग्य ती सर्व मदत केली जात आहे.
तैवानमधील मोठे भूकंप
- हुआलिनला शेवटचा भूकंपाचा धक्का २०१८ मध्ये बसला होता ज्यात १७ जण ठार झाले होते आणि एक ऐतिहासिक हॉटेल जमीनदोस्त झाले होते.
- तैवानमध्ये २१ सप्टेंबर १९९९ रोजी ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात २४०० जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे १ लाख जखमी झाले, हजारो इमारती नष्ट झाल्या.
जुन्या इमारतीच कोसळल्या...
मी २४ व्या मजल्यावर राहात असल्याने घाबरलो होतो. मात्र, सोसायटीने तत्काळ अलार्म वाजवून आम्हाला न घाबरण्याचे आवाहन केले. पायऱ्यांनी खाली येण्यास सांगितले. इतक्या मोठ्या रिक्टर स्केलचा भूकंप होऊनही येथे अधिक नुकसान झालेले नाही. जुन्या इमारतींचे नुकसान झाले आहे. राजधानीत तर एकाही इमारतीचे नुकसान झालेले नाही.