'कब्जा केला तर संपूर्ण आशियात विनाश होईल', तैवानचा चीनला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 04:53 PM2021-10-05T16:53:42+5:302021-10-05T16:54:41+5:30
Tsai Ing-wen : विशेष म्हणजे साई इंग-वेन यांचे हे भाष्य अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन तैवानवर प्रचंड दबाव आणत आहे.
चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. 1 ऑक्टोबर रोजी चीनने आपला राष्ट्रीय दिन साजरा केला आणि आपल्या लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या संरक्षण हवाई क्षेत्रामध्ये 38 लढाऊ विमानांचे उड्डाण केले होते. आता या प्रकरणी तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई इंग-वेन (Tsai Ing-wen) यांनी चीनला इशारा दिला आहे. (taiwan president talks about the chinese incursions and said that it will be catastrophic for asia)
जर चीनने तैवानवर कब्जा केला तर त्याचे संपूर्ण आशियामध्ये भयंकर आणि विनाशकारी परिणाम होतील, असे साई इंग-वेन यांनी म्हटले आहे. दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी यासंदर्भातील एक लेख परराष्ट्र व्यवहार मासिकात लिहिला आहे. त्या म्हणाल्या की, तैवानला लष्करी संघर्ष नको आहे, परंतु तैवान स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणे चुकवणार नाही.
विशेष म्हणजे साई इंग-वेन यांचे हे भाष्य अशा वेळी आले आहे, जेव्हा चीन तैवानवर प्रचंड दबाव आणत आहे. तैवान स्वतःला एक स्वशासित लोकशाही बेट मानतो, पण चीन म्हणते की, तैवान हा त्याचाच एक भाग आहे. तसेच, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही म्हटले आहे की, तैवानला चीनने निश्चितपणे जोडले जाईल.
दरम्यान, चीनच्या राष्ट्रीय दिनी, 38 लढाऊ विमाने शुक्रवारी तैवानच्या हवाई हद्दीवरून दोनदा उड्डाण केली आणि चीनने आतापर्यंतचे हे सर्वात मोठे अतिक्रमण असल्याचे वर्णन केले. तैवानमध्ये 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर चीनने या भागात लष्करी, मुत्सद्दी आणि आर्थिक दबाव वाढवला आहे, कारण साई इंग-वेन या निवडणूक जिंकल्यानंतर तैवानला एक स्वतंत्र राष्ट्र मानत आहे. त्यांनी तैवान हा चीनचा भाग नाही, असे वारंवार सांगितले गेले आहे.
विशेष म्हणजे, महासत्ता असूनही चीन क्युबापेक्षा लहान असलेल्या तैवानवर लष्करी हल्ला करू शकलेला नाही. चीनपासून फक्त 180 किमी अंतरावर तैवानची भाषा आणि पूर्वज चीनी आहेत, परंतु तेथील राजकीय व्यवस्था अगदी वेगळी आहे. मात्र, चीन आपली लष्करी क्षमता दाखवून तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.