तैवानचे लाइ चिंग-ते यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय; चीनचे कट्टर विरोधक म्हणून ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 07:58 PM2024-01-13T19:58:03+5:302024-01-13T20:00:02+5:30
चीनने निवडणुकीपूर्वीच लाइ चिंग-ते यांना फुटीरतावादी घोषित केले होते.
तैवानच्या सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (डीटीपी) नेते लाइ चिंग-ते यांनी आज (शनिवारी) झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. लाइ चिंग-ते आणि त्यांचा पक्ष डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात.
चीनने निवडणुकीपूर्वीच लाइ चिंग-ते यांना फुटीरतावादी घोषित केले होते. चीनने तैवानच्या जनतेला स्पष्टपणे सांगितले होते की, जर त्यांना लष्करी संघर्षाची परिस्थिती टाळायची असेल तर त्यांना योग्य पर्याय निवडावा लागेल.
डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने रचला इतिहास-
लाइ चिंग-ते यांच्या विजयासह, त्यांच्या डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येऊन इतिहास रचला आहे. मात्र, त्यांच्या विजयामुळे चीन आणि तैवानमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
तीन उमेदवारांमध्ये होती स्पर्धा-
लाइ चिंग-ते व्यतिरिक्त, विरोधी पक्ष कुओमिंतांग (केएमटी) चे हौ यू इह आणि तैवान पीपल्स पार्टीचे को वेन जी यांच्यात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लढत होती. केएमटी हा चीन समर्थित पक्ष मानला जातो. हौ यू इह हे राजकारणात येण्यापूर्वी पोलिस दलाचे प्रमुख होते. निवडणूक जिंकल्यास देशाची सुरक्षा आणखी मजबूत करू आणि चीनशी संबंध सुधारण्याचा आग्रह धरू, असे आश्वासन केएमटीच्या हौ यांनी दिले होते. त्याचवेळी तैवान पीपल्स पार्टीचे वेन झे हेही निवडणुकीच्या मैदानात होते. २०१९मध्ये त्यांनी तैवान पीपल्स पार्टीची स्थापना केली. निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वतःला उमेदवार म्हणून सादर केले होते जो चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांशी संबंध वाढवण्याच्या बाजूने आहे.
चीन आणि तैवान यांच्यात दुरावा का?
चीन आणि तैवानमधील संबंध वेगळे आहेत. तैवान हे चीनच्या दक्षिण-पूर्व किनार्यापासून १०० मैल किंवा सुमारे १६० किलोमीटर अंतरावर स्थित एक लहान बेट आहे. तैवान १९४९ पासून स्वतःला एक स्वतंत्र देश मानत आहे. परंतु आतापर्यंत जगातील केवळ १४ देशांनी याला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे आणि त्याच्याशी राजकीय संबंध प्रस्थापित केले आहेत. चीन तैवानला आपला प्रांत मानतो आणि त्याला विश्वास आहे की, एक दिवस तैवान चीनचा भाग बनेल. त्याचबरोबर तैवान स्वतःला स्वतंत्र देश म्हणवतो.