"८० लाख घे आणि 'ते' काढ"... विमानात करोडपती माणसाची शेजारी बसलेल्या महिलेला विचित्र 'ऑफर'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:42 PM2023-03-15T19:42:30+5:302023-03-15T19:43:33+5:30
गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात महिलांसोबत गैरवर्तन झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत.
Millionaire gives strange offer to woman: गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या बातम्यांनी लोक हैराण झाले आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका करोडपतीने महिला प्रवाशाकडे अशी विचित्र मागणी केली, जी ऐकून ती थक्क झाली. लक्षाधीश व्यक्तीने महिलेला सांगितले की काही तरी करण्यासाठी तो तिला 80 लाख रुपये देण्यास तयार आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे करोडपतीने स्वतः ट्विट करून लोकांना याची माहिती दिली. स्टीव्ह किर्श यांनी @stkirsch हँडलवरून ट्विट केले, 'मी सध्या डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटवर आहे. माझ्या शेजारी एक महिला बसली आहे, जी एका फार्मा कंपनीत काम करते.' स्टीव्हने पुढे लिहिले की, 'मी तिला फ्लाइट दरम्यान तिचा फेस मास्क काढण्यास सांगितले. यासाठी मी तिला 1 लाख डॉलर्सची ऑफरही दिली, पण तिने नकार दिला.' यानंतर स्टीव्हने महिलेला सांगितले की, आता हे (मास्क) उपयोगाचे नाही.'
I am on board a Delta flight right now. The person sitting next to me in first class refused $100,000 to remove her mask for the entire flight. No joke. This was after I explained they don’t work. She works for a pharma company. pic.twitter.com/Q8Hwzhkmxf
— Steve Kirsch (@stkirsch) March 10, 2023
स्टीव्हने एकामागून एक अनेक ट्विट केले, ज्यात त्याने लिहिले की त्या महिलेने त्याची मोठी ऑफर स्पष्टपणे नाकारली. मात्र, त्यानंतरही तो महिलेला मास्क काढण्यास सांगत होता. स्टीव्हने सांगितले की जेव्हा फ्लाइटमध्ये नाश्ता दिला जात होता, तेव्हा महिलेने तिचा मास्क काढून टाकला होता. पण माझी ऑफर मात्र तिने नाकारली.
दरम्यान या करोडपती माणसाच्या कृत्यामुळे नेटकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला आहे. अनेक युजर्सनी स्टीव्हच्या अशा वागणुकीवर टीका केली आहे. लोक म्हणतात की त्या व्यक्तीने स्वतःच्या कामाशी काम ठेवायला हवे. दुसरीकडे, मास्क काढण्यासाठी पैशाची ऑफर देऊन आपल्या संपत्तीचा माज दाखवणे चुकीचे आहे, असेही एकाने म्हटले. स्टीव्हला फ्लाइटमध्ये प्रवास करताना महिला प्रवाशांना अशा प्रकारे त्रास देण्याची सवय आहे का, असाही प्रश्न एकाने विचारला आहे.
news.com.au च्या रिपोर्टनुसार, हा करोडपती व्यक्ती देखील कोरोना महामारीच्या काळातही विचित्र वर्तणुकीमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर स्टीव्हने लस आणि मास्कबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवली होती. इतकेच नाही तर याआधीही फ्लाइटमध्ये त्याने सहप्रवाशाला पैशाच्या बदल्यात मास्क काढण्याची ऑफर दिली होती. तेव्हाच तो म्हणाला होता की, मी पुढल्या वेळी ८० लाखांची ऑफर देईन.