महिनाभर पगारी रजा घ्या, हनिमूनला जा; मुलं जन्माला घालावीत म्हणून चीनचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:13 PM2023-02-24T12:13:20+5:302023-02-24T12:13:49+5:30

अनेक दाम्पत्यांनी आपल्याला एकही मूल होणार नाही, याची सुरुवातीपासूनच तजवीज केली, एवढंच नाही, अनेकांनी तर लग्नालाच नकार दिला. 

Take a month's paid leave, go on a honeymoon; China's struggle to have children | महिनाभर पगारी रजा घ्या, हनिमूनला जा; मुलं जन्माला घालावीत म्हणून चीनचा आटापिटा

महिनाभर पगारी रजा घ्या, हनिमूनला जा; मुलं जन्माला घालावीत म्हणून चीनचा आटापिटा

googlenewsNext

काय अडचण आहे तुम्हाला? लग्नाला मुलगा किंवा मुलगी मिळत नाही? पैशांचा प्रश्न आहे? राहायला घर नाही? नोकरीतून सुटी मिळत नाही? लग्नानंतर मुलं झाली तर त्यांच्या पालनपोषणाचं, त्यांच्या शिक्षणाचं काय होईल अशी भीती वाटते?  दोघंही नोकरी करता म्हणून होणाऱ्या मुलाला कोण सांभाळेल या काळजीनं तुम्हाला पोखरलंय? वाढत्या महागाईमुळे मुलाला जन्म देणं  परवडणार नाही, असं तुम्हाला वाटतंय? नोकरीच्या ठिकाणी कामाची फार दगदग आहे? तुम्ही आणि तुमचा भावी जोडीदार वेगवेगळ्या शहरात राहता, त्यात कामाच्या वेळा या अशा अडनडीच्या, मग एकत्र कसं राहता येणार, याची चिंता तुम्हाला वाटतेय? तुमच्या लग्नात तुमच्या घरच्यांची, आईवडिलांची काही आडकाठी आहे?... तुमच्या लग्नाच्या मार्गात कोणती अडचण येतेय तेवढं फक्त सांगा, तुमच्या सगळ्या अडचणी तातडीनं दूर केल्या जातील आणि तुमचं वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी होईल याची गॅरंटी आम्ही घेऊ!...

- कोण म्हणतंय हे? लोकांच्या लग्नाची एवढी काळजी, कळकळ कोणाला लागून राहिलीय? हे आहे चीनचं सरकार! तरुणांनी लग्न करावं, तातडीनं मुलं जन्माला घालावीत यासाठी ‘उपवर’ तरुण-तरुणींसाठी चीन सरकारने अक्षरश: पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. वर जी यादी दिलीय, त्यातल्या साऱ्या गोष्टी सोडविण्याची हमी तर त्यांनी ‘विवाहेच्छुक तरुण-तरुणींना वेळोवेळी दिलीच, एवढंच नव्हे, काही ठिकाणी तर अनेक सुविधा त्यांनी आधीच तयार करून ठेवल्या आहेत, तरीही चीनमधील तरुणाई ना लग्न करायला तयार आहे, ना मुलं जन्माला घालायला ! यावर कडी म्हणून चीनच्या काही प्रांतांमध्ये तरुण-तरुणींना लग्नासाठी आता आणखी वेगळं आमिष दाखवलं जातंय.. ‘तुम्ही फक्त लग्न करा, ऑफिसच्या कामाची आणि जबाबदाऱ्यांची काहीही काळजी करू नका, ते सर्व आम्ही पाहून घेऊ.. ऑफिसचं काम काय, आज नाही तर उद्या होईल, पण सध्या तारुण्यातील तुमचे दिवस मौजमजेचे आहेत. जा, प्रेम करा, ऐश करा. कुठलाही विचार न करता, वाट्टेल तिथे हनिमूनला जा, रजेची चिंता करू नका. लग्नासाठी म्हणून तुम्हाला एक महिनाभर सुटी मिळेल, तिही भरपगारी ! 

तरुणांनी लग्न करून मुलं जन्माला घालावीत यासाठी चीनचा हा असा आटापिटा सुरू झाला आहे. हा तोच चीन आहे, ज्यानं आपली लोकसंख्या कमी करण्यासाठी अचानक फतवा काढला होता आणि कोणत्याही दाम्पत्याला एकापेक्षा जास्त मुलं जन्माला घालण्यावर मनाई केली होती. १९८० ते २०१५पर्यंत चीनमध्ये ‘वन कपल, वन चाइल्ड’ ही पॉलिसी सुरू होती. त्याचे दुष्परिणाम दिसायला लागल्यावर, चीनमध्ये म्हाताऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढायला लागल्यानंतर चीनला आपली चूक कळली आणि त्यांनी आपला तो ‘फतवा’ मागे घेतला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ‘एकच मूल’ तर जाऊ द्या, अनेक दाम्पत्यांनी आपल्याला एकही मूल होणार नाही, याची सुरुवातीपासूनच तजवीज केली, एवढंच नाही, अनेकांनी तर लग्नालाच नकार दिला. 

चीनमधलं सरकार तर आता इतकं ‘उदार’ झालं आहे आणि इतकं हातघाईवर आलं आहे की, त्यांनी तरुणाईला हेदेखील सांगायला सुरुवात केली की, बाबांनो, ठीक आहे, नाही तुम्हाला लग्न करायचंय ना, नका करू, पण लग्न केलं नाही म्हणून मूल जन्माला घालायचं नाही असं तर नाही ना.. लग्न न करताही तुम्ही मूल जन्माला घातलं तरी सरकार त्याचं स्वागतच करेल.. लग्न करून मूल जन्माला घालणाऱ्या तरुणांना म्हणूनच चीन सरकारनं आता नवं आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. लग्न करणाऱ्या दाम्पत्यापैकी दोघंही नोकरी करीत असतील, तर दोघांनाही भरपगारी सुटीचं नवं ‘लॉलीपॉप’ त्यांनी देऊ केलं आहे.

लग्नाला नकार देतानाच मुलं जन्माला घालण्याबाबतही तरुणाईनं हात वर केल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम चीनला सोसावे लागताहेत. त्यांच्या अर्थव्यवस्थेवर तर त्याचा विपरित परिणाम झाला आहेच, देशात म्हाताऱ्यांची संख्याही झपाट्यानं वाढू लागली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये तर चीनच्या दर हजार लोकसंख्येमागे जन्मदर केवळ ६.७ इतका होता. हा आजवरचा सर्वांत कमी जन्मदर समजला जातोय. त्यामुळे चीनचं धाबं दणाणलं आहे. 

नकोच ते लग्न !
चीनमधील तरुणाईनं लग्नाकडे पाठ फिरवल्यानं तिथल्या लग्नांची संख्याही झपाट्यानं कमी होते आहे. २०२१या वर्षात चीनमध्ये केवळ ७६ लाख विवाहांची नोंदणी झाली. जवळपास दीड अब्ज लोकसंख्येच्या या महाकाय देशात वर्षाला ७६ लाख लग्नं म्हणजे अगदीच किरकोळ ! चीनमधील लग्नांची ही संख्या गेल्या तीस वर्षांत नोंदल्या गेलेल्या विवाहांपेक्षा अतिशय कमी आहे. १९८६पासून चीनमध्ये लग्नसंख्येत सातत्यानं घट होत आहे. त्यात अजूनही घट झालेली नाही.

Web Title: Take a month's paid leave, go on a honeymoon; China's struggle to have children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.