रेल्वे रुळ ओलांडताना तुम्हीही काळजी घ्या, नाहीतर असं होऊ शकतं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 12:15 PM2017-12-01T12:15:56+5:302017-12-01T12:33:11+5:30
स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी तरी रेल्वेरुळ ओलांडू नये, असं कायम सांगितलं जातं,मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
मेलबॉर्न : ट्रेन, पाणी आणि आग या तीन गोष्टींशी कधीच पंगा घ्यायचा नाही असं म्हटलं जातं. कारण या गोष्टी आपल्या आयुष्यात जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच त्या आपल्या जीवावर उठणाऱ्याही आहेत. रेल्वे रुळ पार करू नये असं कित्येकदा सांगितलं जातं, मात्र या सुचनेकडे प्रवाशांकडून अक्षम्य दुर्लक्ष केलं जातं. मुंबईतही ट्रेनच्या खाली येऊन कित्येक प्रवाशांचा जीव गेला आहे. रेल्वे रुळ पार करणं किती हानीकारक आहे याविषयी जनजागृती होऊनही जगभरात रेल्वे रुळ प्रवाशांकडून ओलंडलच जातं. असाच एक प्रकार ऑस्ट्रेलियातील एका रेल्वे स्थानकावर झाला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एका महिलेने आपला मृत्यू आपल्या डोळ्यांसमोरच पाहिला पण दैव बलवत्तर म्हणून ती त्यातून वाचली.
ऑस्ट्रेलियातील एका रेल्वे स्थानकावर एक महिला रेल्वे रुळ ओलांडत होती. सुरुवातीला त्याच रुळावरून ट्रेन येत असल्याचं तिच्या लक्षात आलं नाही. रेल्वे रुळांवरून ती प्लॅटफॉर्मवर चढत असताना समोरून ट्रेन येत असल्याचं दिसलं. पण तिला रुळांवरून प्लॅटफॉर्मवर चढणं कठीण गेलं. त्यावेळेस स्थानकावर गर्दीही नव्हती. त्यामुळे ती आणखी घाबरली. जोर जोरात तिने मदतीसाठी हाका मारल्या. तेव्हा तेथील एक पोलीस कर्मचारी तिच्या मदतीसाठी धावून आला. मात्र तरीही त्या महिलेला प्लॅटफॉर्मवर चढणं कठीण गेलं. या गोंधळात ट्रेन अगदी तिच्याजवळच आली होती. एवढ्यात आणखी दोन पोलीस कर्मचारी तिथे पोहोचले आणि ट्रेनने उडवण्याच्या आधीच त्या महिलेला रुळांवरून प्लॅटफॉर्मवर खेचण्यात आलं. अगदी काहीच मीटरच्या अंतरावर ट्रेन होती, वेळीच जर महिला प्लॅटफॉर्मवर चढली नसती तर तिला ट्रेनने फरफटत नेलं असतं. तेथील प्रसार माध्यमांनी सांगितल्यानुसार त्या महिलेने मद्यप्राशन केलं होतं.
सीजीटीएन या प्रसार माध्यामाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. तेथील पोलीस कर्मचाऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, रेल्वे रुळावर महिलेला पाहून ट्रेनच्या मोटरमनने इमरजन्सी ब्रेक मारला पण ट्रेनचा वेग इतका होता की ब्रेक मारल्यावरही ट्रेन काही अंतर पुढे जाऊन थांबली. मात्र महिलेला वेळीच प्लॅटफॉर्मवर खेचण्यात आम्हाला यश आल्याने तिचा जीव वाचला. हा सगळा थरार काही सेकंदाच्या अवधीतच झाला असला तरी व्हिडिओ पाहताना सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.