भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या बेंजामिन नेतान्याहू यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 12:27 PM2018-02-14T12:27:04+5:302018-02-14T12:28:37+5:30
इस्रायलच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा विचार करता ते आपले पद सहज सोडतील असे दिसत नाही.
जेरुसलेम- इस्रायलच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांनी मिळवलेली लोकप्रियता आणि त्यांना मिळालेला पाठिंबा याचा विचार करता ते आपले पद सहज सोडतील असे दिसत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप अधिकाधिक गंभीर स्वरुप घेत असले तरी पंतप्रधान बेंजामिन आपलं पद सोडतील याबाबत साशंकताच आहे.
पोलिसांनी बेंजामिन नेतान्याहू यांना दंडित करण्याचे सुचवले आहे मात्र पोलिसांना त्यापुढे कोणतेही अधिकार नाहीत. पोलीस केवळ दंडाची शिफारस करू शकतात. त्यापुढील पावले उचलण्याची जबाबदारी इस्रायलचे महान्यायवादी अविखाय मँडेलब्लिट यांच्यावर आहे. केवळ तेच या आरोपांचे पुढे काय करायचे हे ठरवू शकतात. इस्रायली माध्यमांच्या मते, जरी नेतान्याहू यांची चौकशी झाली तरी त्यांची लोकप्रियता, त्यांच्या सत्ताधारी आघाडीतील सदस्य पक्ष, त्यांच्या पक्षांतील इतर सदस्य याच्यावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. त्यांनी पायउतार व्हावे यासाठी कोणतेही जनमत तयार जालेले नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये नेतान्याहू यांनी दिलेल्या मुलाखतीत 2019 सालच्या निवडणुकांमध्येही आपण विजयी होऊ असा विश्वास ठामपणे व्यक्त केलेला आहे.
BREAKING: Israeli media reports say police recommending Netanyahu indictment on corruption charges, including bribery.
— The Associated Press (@AP) February 13, 2018
नेतान्याहू यांचा जन्म 1949 साली तेल अविव येथे झाला. त्यांचे वडिल सुप्रसिद्ध इतिहासकार होते. 1960 च्या दशकामध्ये वडिलांच्या नोकरीमुळे ते अमेरिकेत काही काळ स्थायिक झाले होते. नेतान्याहू यांचा मोठा भाऊ योनाथन नेतान्याहू याला युगांडा येथे झालेल्या ऑपरेशन एन्टेबीमध्ये आपले प्राण गमवावे लागले. मात्र या कारवाईमुळे इस्रायलच्या अपहृत नागरिकांना सोडवण्यात इस्रायलला यश मिळाले होते. अत्यंत सफाईदार अमेरिकेन-इंग्लिश बोलणाऱ्या नेतान्याहू यांचे गुण इस्रायलने आणि संपूर्ण जगाने सर्वात प्रथम 1987 साली ओळखले. संयुक्त राष्ट्रामध्ये इस्रायलचे दूत म्हणून काम करत असताना त्यांनी पहिल्या पॅलेस्टाइनी इंतिफादाच्यावेळेस इस्रायलची बाजू लावून धरली होती. त्यानंतर त्यांनी उजव्या विचारसरणीच्या लिकूड पक्षाद्वारे राजकारणामध्ये प्रवेश केला. 1995 साली तत्कालीन पंतप्रधान यिटझॅक राबिन यांची हत्या झाल्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1996 साली पंतप्रधान होण्याची संधी बेंजामिन यांना मिळाली. या पदावर बसणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आणि इस्रायलमध्ये जन्मलेले ते पहिले पंतप्रधान होते. मात्र या कार्यकाळात ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत राहिली. 1999 साली निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पक्षामध्ये दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अरायल शेरॉन यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणे त्यांना भाग पडले. 2009 साली नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान झाले. तर त्यांनी 2019 पर्यंत या पदावरती राहाण्याचा निर्णय कायम ठेवला तर ते इस्रायलचे सर्वाधीक काळ सत्तेत राहाणारे पंतप्रधान ते होतील.