शिक्षकांवर सूड उगवण्यासाठी अभिनेत्याने बुलडोझर फिरवून पाडली शाळेची इमारत!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:26 PM2024-05-04T17:26:17+5:302024-05-04T17:31:55+5:30
अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन शाळेची इमारत जमीनदोस्त केल्याची माहिती दिली आहे.
Viral News : आपल्याकडे एखाद्या वास्तूबाबत किंवा ठिकाणाबाबत नेहमीच चांगल्या-वाईट आठवणी असतात. अनेक वेळा या आठवणी आयुष्यभर आपल्याला आठवतात आणि त्या आपल्यासोबत राहतात. शाळा हेसुद्धा असंच ठिकाणं आहे ज्याच्या आठवणी कोणीही कधीच विसरणार नाही. शाळेत प्रत्येकाला चांगले वाईट दोन्ही अनुभव आलेले असतात. पण वय जसं वाढतं तसे हे अनुभव गाठीशी बांधून पुढे जात असतो. पण एका अभिनेत्याने शाळेची इमारत पाडून त्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकांचा बदला घेतला आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का?
अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. अभिनेत्याने त्याच्यासोबत शाळेत घडलेली घटना एवढी मनावर घेतली की त्याने मोठं झाल्यानंतर ती शाळाच पाडून टाकली. अभिनेत्याने शाळेची जागा विकत घेतली आणि नुकतीच ती इमारत पाडली. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट करुन याची माहिती दिलीय.
अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर शाळेच्या इमारतीच्या ढिगाऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. "माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारायचे. म्हणून हा राग मनात ठेवून मी आज ही शाळेची जागा विकत घेतली आणि या शाळेच्या इमारतीवर बुलडोझर फिरवला. एका विशिष्ट मानसिक स्थितीत मी हे कृत्य केलंय," असं या अभिनेत्यानं म्हटलं आहे.
काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी अभिनेत्याच्या या कृतीवर टीका केली तर काहींनी त्याचे समर्थन केले. एका युजरने "एक कलाकार म्हणून तुमच्याबद्दलचा माझा आदर अमर्याद आहे, पण मला वाटते की सर जे झालं ते चांगले नाही. तुमचे आणि तुमच्या शिक्षकांचे अनुभव वेगळे आहेत, पण तुम्ही शाळा आणि सर्व काही उद्ध्वस्त केले, ते चांगले नव्हते," असं म्हटलं आहे.
आणखी एका युजने, "ज्या पिढीला त्यांच्या प्राथमिक शाळेत असताना मारहाण झाली ती पिढी यशस्वी आहे आणि वरिष्ठांचा आदर करते, असं म्हटलं आहे. दुसरीकडे अनेकांनी या कृतीचे समर्थन केले. "तुम्ही माझे स्वप्न जगत आहात. तुम्हाला अधिक शक्ती मिळो, असे एकाने म्हटलं आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने, मी खरंतर त्याचे समर्थन करतो कारण मला माहित आहे की लहान मुलांवर आघात कसा होतो. मला माझ्या शाळेमध्येही असेच करायचे आहे कारण बरेच शिक्षक वाईट होते," असं म्हटलं आहे.
कोण आहे हा अभिनेता?
तर शाळेची इमारत पाडणारा हा तुर्की अभिनेता कॅग्लर एर्तुग्रल आहे.२००२० मध्ये ‘अफिल आस्क’मधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय इतर काही मालिका आणि चित्रपटांत त्याने भूमिका केल्या आहेत.