नोकरीसाठी नेले अन् बेकायदेशीर कामांत अडकविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 06:58 AM2024-04-07T06:58:12+5:302024-04-07T06:58:40+5:30
कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लाओस या देशात नोकरीच्या आमिषाने बेकायदा कामांमध्ये ढकललेल्या सतरा भारतीयांची सुटका करण्यात आली असून ते मायदेशी रवाना झाले आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
ओसच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याने व तेथील भारतीय राजदूतावासाने केलेल्या प्रयत्नांमुळेच सतरा भारतीयांची सुटका करणे शक्य झाल्याचे एस. जयशंकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, देशात व विदेशातही मोदी यांची गॅरंटी उपयुक्त ठरत आहे.
कंबोडियामध्ये उत्तम नोकरी मिळेल असे आमिष दाखवून अनेक भारतीयांना तिथे नेऊन सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकविण्यात आले होते. त्यामुळे आग्नेय आशियातील देशांत नोकरीच्या संधी शोधणाऱ्या भारतीयांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये व सावधपणे व्यवहार करावेत, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने गुरुवारी म्हटले होते. त्यानंतर आता लाओसमधून १७ भारतीयांची सुटका केल्याची घटना उजेडात आली आहे.