तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 05:52 PM2021-12-21T17:52:38+5:302021-12-21T18:43:54+5:30
Taliban : एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला नोव्हेंबरपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अफगाणिस्तानातीलतालिबान सरकार गेल्या महिन्यापासून आर्थिक संकटात सापडले आहे. अशा परिस्थितीत तालिबान सरकारवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कारण, अफगाणिस्तानचे चुकून 6 कोटी रुपये ताजिकिस्तानला ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. पण, तालिबानचा शत्रू देश ताजिकिस्तानने पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला.
WION वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील अवेस्ता (Avesta) नावाच्या वेबसाइटचा दावा आहे की, तालिबानने ताजिकिस्तानच्या अफगाण दूतावासाला 8 लाख डॉलर ट्रान्सफर केले, जे भारतीय चलनात जवळपास 6 कोटी रुपये होतात. हे पैसे अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी ताजिकिस्तानमधील अफगाण दूतावासातील लोकांच्या कल्याणासाठी मंजूर केले होते.
ताजिकिस्तानमध्ये निर्वासित म्हणून राहणाऱ्या मुलांना शालेय शिक्षण देण्यासाठी हा पैसा खर्च केला जाणार होता. घनी अफगाणिस्तानातून पळून गेल्यावर तालिबानने हा करार रद्द केला, पण चुकून ही रक्कम ताजिकिस्तानला ट्रान्सफर करण्यात आली. ही रक्कम काही आठवड्यांपूर्वीच ट्रान्सफर करण्यात आली होती. काही सुत्रांचे म्हणणे आहे की, लाख डॉलरमध्ये या दावा बंद करण्यात आला, परंतु याबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही.
ताजिकिस्तानकडून रक्कम परत स्पष्टपणे नकार
एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला नोव्हेंबरपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात तालिबान सरकाने त्यांची आर्थिक स्थिती पाहिली असता ही रक्कम दिसून आली. तालिबान सरकारने ही रक्कम ताजिकिस्तानकडून परत मागितली असता, त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि ही रक्कम खर्च झाल्याचे सांगितले. आम्ही शाळा बांधल्या नसल्या तरी दूतावासातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम खर्च करण्यात आली असल्याचे ताजिकिस्तानने सांगितले.