तालिबान्यांना हवी आहे तरुण पोरींची यादी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 05:27 AM2021-08-14T05:27:20+5:302021-08-14T05:28:19+5:30

तालिबानी अतिरेकी जबरदस्तीनं आपल्या मुलींशी निकाह लावणार म्हटल्यावर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य कुटुंबं अक्षरश: हादरली आहेत. आपल्या मुली, सुना त्यांनी अक्षरश: लपवून ठेवायला सुरुवात केली आहे.

Taliban ask for list of girls above 15 widows under 45 to be married to their fighters | तालिबान्यांना हवी आहे तरुण पोरींची यादी!

तालिबान्यांना हवी आहे तरुण पोरींची यादी!

googlenewsNext

तुमची मुलगी किती वर्षांची आहे? १५ वर्षांपेक्षा मोठी आहे ना? मग ती अजून घरात कशी? आणि ही महिला कोण? पंचेचाळिशीच्या आतली दिसतेय.. नवरा मेलाय वाटतं तिचा? मग घरी का बसवलंयत तिला? या सगळ्या मुलींची आणि बायकांची यादी ताबडतोब आम्हाला द्या! कशाला पाहिजे ही यादी?- अर्थातच लग्नासाठी! पण, कोण लावणार त्यांची लग्नं आणि तेही त्या मुलींच्या, बायकांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या संमतीविनाच? मुख्य म्हणजे हा फतवा काढलाय तरी कोणी? 

- ‘नाही मानणार आम्ही तुमचं म्हणणं, काय करायचं ते करा,’ असं म्हणण्याचा पर्याय अर्थातच या स्त्रियांकडे नाही.. मान्य करा नाहीतर मरा! - कारण हा फतवा काढलाय तालिबान्यांनी आणि त्यासाठी त्यांनी आधार घेतलाय अफगाणिस्तानातील गावागावांत असलेल्या मुल्ला-मौलवींचा. तालिबान्यांनी त्यांना आदेश दिलाय, ज्या घरात १५ वर्षांपेक्षा मोठी मुलगी आहे आणि ज्या घरात ४५ च्या आतली विधवा आहे, त्यांची यादी करून झटपट आम्हाला द्या.. त्यांना आता घरात ठेवता येणार नाही.. यांना काही संस्कृती वगैरे आहे की नाही? या मुली-महिलांची आम्ही लग्नं लावणार आणि आम्हीच करणार त्यांच्याशी लग्नं!
तालिबानी अतिरेकी जबरदस्तीनं आपल्या मुलींशी निकाह लावणार म्हटल्यावर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य कुटुंबं अक्षरश: हादरली आहेत. आपल्या मुली, सुना त्यांनी अक्षरश: लपवून ठेवायला सुरुवात केली आहे. आधीच त्यांना बाहेर पडायची मनाई, आता तालिबान्यांना त्या सहजासहजी सापडणार नाहीत, दिसणार नाहीत, याची तजवीज त्यांचे कुटुंबीय करताहेत.

अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत आहे. अफगाणिस्तानात जवळपास वीस वर्षं असलेलं अमेरिकेचं आणि नाटोचं सैन्य माघारी परतताच तालिबान्यांनी पुन्हा नंगानाच सुरू केला आहे. अगदी काही दिवसांतच अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग त्यांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. अफगाणिस्तानात सरकार आता नावालाच उरलं आहे. वीस वर्षांपूर्वीचं आपलं साम्राज्य त्यांनी आता पुन्हा विस्तारायला घेतलं आहे. 
भारताने अफगाणिस्तानला ‘एमआय-३५’ ही चार हेलिकॉप्टर्स भेट दिली होती, त्यातील एक आता तालिबान्यांच्या कब्जात आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर इराण, पाकिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान इत्यादी शेजारी देशांच्या सरहद्दीवरील बहुतांश ठिकाणंही ताब्यात घेऊन तालिबान्यांनी सर्वांची नाकेबंदी केली आहे. तरीही तालिबान्यांच्या तावडीतून कसं सुटता येईल आणि देशाबाहेर निसटता येईल याचा विचार अनेक कुटुंबीय; विशेषत: ज्यांच्या घरी तरुण मुली आणि सुना आहेत, ते करू लागले आहेत. कारण तालिबान्यांनी आधीच अनेक तरुण मुलींना उचलून नेलं आहे आणि बळजबरींनं त्यांच्याशी लग्नं लावली आहेत.

तालिबान्यांमुळे अफगाणिस्तानात अक्षरश: दहशत पसरली आहे. तालिबानी अतिरेक्यांनी अनेक भागात पुन्हा ‘सत्ता’ ताब्यात घेतल्यानं आणि खुलेआम शस्त्रं घेऊन ते फिरू लागल्यामुळं अनेक कुटुंबांतील तरुण मुली ‘बेपत्ता’ झाल्या आहेत. काही स्वत:हूनच घरून पळून गेल्या आहेत आणि ‘सुरक्षित’ ठिकाणी आसरा घेण्याच्या प्रयत्नांत  आहेत. ‘मुलगी’ असल्याची आपली ओळखही अनेकींनी लपवली आहे. तरुणांसारखा पोशाख करताना आपले केसही कापले आहेत. अनेक आई-बाप स्वत:हूनच आपल्या तरुण मुलींना घरातून पळायला मदत करीत आहेत. आपल्या मुलीचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तालिबानी आपल्यालाही मारझोड करतील आणि आपल्याकडून मुलीचा पत्ता काढून घेतील, या भीतीनं आईबापच मुलींना सांगताहेत, तुम्ही कुठे आहात, ते आम्हालाही सांगू नका.. जा, आपलं आयुष्य जगा, पण, या तालिबान्यांच्या तावडीत सापडू नका.

अनेक लोक दबक्या आवाजात सांगताहेत, तालिबानी पुन्हा शिरजोर झाल्यानं आम्ही अतिशय भयभीत आणि निराश झालो आहोत. आम्ही आमच्या घरातही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही, गप्पा मारू शकत नाही, संगीत ऐकू शकत नाही, महिलांना बाजारात पाठवू शकत नाही. 

हाजी रोझी बेग सांगतात, मला दोन मुली आहेत. एक २३ आणि दुसरी २४ वर्षांची. तालिबानी त्यांना केव्हाही उचलून नेतील आणि बळजबरीनं त्यांच्याशी निकाह लावतील, अशी आम्हाला भीती आणि खात्रीही आहे! एका तालिबानी कमांडरनं तर स्पष्टच सांगितलंय, अठरा वर्षांपुढील मुलींना तुम्ही घरात ठेवू शकत नाही. त्यांचं लग्न न लावता त्यांना घरात ठेवणं हे पाप आहे!

माहीत नाही, मी जिवंत राहीन का?
तरुण मुली आणि स्त्रियांवर किती भयानक परिस्थिती गुदरली आहे, याबाबत अफगाणमधील एक २२ वर्षीय  तरुण महिला पत्रकार (अर्थातच आपली ओळख, नाव लपवून) सांगते, उत्तर अफगाणमधील माझ्या शहरावर काही दिवसांपूर्वीच तालिबान्यांनी कब्जा केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी घरातून पळाले. गेल्या आठवड्यापर्यंत मी पत्रकार होते, आता कोणीच नाही. आज मला स्वत:चं नावदेखील नाही.. तालिबान्यांपासून मी पळते आहे, माहीत नाही, किती दिवस पळू शकेन. जिवंत राहीन का? पुन्हा घरी जाऊ शकेन का? आईवडिलांना भेटू शकेन का? आमच्यासाठी सारे रस्ते बंद झाले आहेत....

Web Title: Taliban ask for list of girls above 15 widows under 45 to be married to their fighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.