दक्षिण अफगाणिस्तानात मुसंडी मारत तालिबानचा आणखी ४ शहरांवर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:12 AM2021-08-14T06:12:35+5:302021-08-14T06:12:52+5:30
तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला.
काबूल : अफगाणिस्तानधून अमेरिकन फौज माघारी परतल्यापासून तालिबानने आपली पकड मजबूत करीत एकापाठोपाठ दक्षिण अफगाणमधील हेल्मंदसह प्रांतांची राजधानी असलेले शहर लश्करगाहसह आणखी ४ प्रांतांच्या राजधानीच्या शहरांपाठोपाठ पश्चिमेकडील घोर प्रांताच्या राजधानीवर कब्जा केला. काबूलला सध्या थेट धोका नाही; परंतु, इतर ठिकाणी तालिबानने पकड मजबूत केली असून तालिबानच्या कब्जात अफगाणिस्तानमधील दोनतृतीयांश भाग आला असून तालिबान आणि सुरक्षा दलादरम्यान लढाई चालू आहे.
तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला. अफगाणिस्तान सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ सूत्रांनी तालिबान बंडखोराच्या दाव्याला दुजोरा देत सांगितले की, तालिबानच्या कब्जात प्रमुख शहर लश्करगाहही गेले आहे. तालिबानने काबूलच्या दक्षिणेकडील लोगार प्रांताकडे जोरदार कूच करीत पुली-ए-अलीममधील पोलीस मुख्यालय आणि जवळचा तुरुंग ताब्यात घेतला आहे. तालिबानची राजधानी काबूलच्या दिशेने आगेकूच चालू आहे. तालिबानच्या एका प्रवक्त्याने ट्वीटमध्ये म्हटले की, कंदहार जिंकत आम्ही शहीद चौकात पोहोचलो आहोत. एका स्थानिक नागरिकानेही तालिबानच्या या दाव्याला दुजोरा दिला.