तालिबान प्रमुख मुल्ला ओमरचा मृत्यू
By admin | Published: July 30, 2015 04:06 AM2015-07-30T04:06:28+5:302015-07-30T04:06:28+5:30
अफगाणिस्तानातील तालिबानचा एकाक्ष प्रमुख मुल्ला ओमर हा मरण पावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर कडक
इस्लामाबाद : अफगाणिस्तानातील तालिबानचा एकाक्ष प्रमुख मुल्ला ओमर हा मरण पावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर कडक नियमानुसार प्रशासन करणाऱ्या मुल्ला ओमरचे राज्य अमेरिकी आक्रमणाने उलथून लावले होते.
अफगाण सरकार व गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने बीबीसीने मुल्ला ओमर दोन वा तीन वर्षांपूर्वीच मारला गेला असे वृत्त दिले आहे. तालिबान प्रवक्त्याचा हवाला देऊन संघटना लवकरच यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करणार असल्याचे बीबीसीने म्हटले आहे. याआधी ईदच्या पूर्वसंध्येस ६ जुलै रोजी तालिबानने ओमरच्या नावाने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात अफगाण सरकार व तालिबान यांच्यातील चर्चेला पाठिंबा देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांत मुल्ला ओमरच्या मृत्यूच्या बातम्या अनेक वेळा प्रसिद्ध झाल्या; पण अफगाण सरकारच्या हवाल्याने हे वृत्त अधिकृतरीत्या प्रथमच प्रसिद्ध झाले आहे. २००१ च्या अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मुल्ला ओमर लपून राहत होता. मुल्ला ओमरच्या पाठिंब्याने अल काईदा प्रमुख ओसामा बिन लादेनने ९/११ चा हल्ला केला होता असे मानले जाते. (वृत्तसंस्था)