पाकमध्ये पुन्हा तालिबानी थैमान

By admin | Published: January 21, 2016 04:10 AM2016-01-21T04:10:41+5:302016-01-21T04:10:41+5:30

पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले.

Taliban flames again in Pakistan | पाकमध्ये पुन्हा तालिबानी थैमान

पाकमध्ये पुन्हा तालिबानी थैमान

Next

पेशावर : वायव्य पाकिस्तानातील अशांत खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी बुधवारी सकाळी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफ्फार खान यांचे नाव धारण करणाऱ्या या विद्यापीठात त्यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कवितांवर परिसंवाद सुरू असताना तालिबानींनी हा राक्षसी रक्तपात केला. लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत चारही हल्लेखोरांचा खात्मा करेपर्यंत त्यांनी वर्गखोल्या आणि वसतिगृहात शिरून केलेल्या बेछूट गोळीबाराने अंगाचा थरकाप उडविणारे रक्ताचे पाट वाहिले होते.
हे विद्यापीठ पेशावरपासून ५० किमी अंतरावर आहे. आजच्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेल्या तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर रोजी पेशावरमध्ये लष्करातर्फे चालविल्या जाणाऱ्या विद्यालयात असाच राक्षसी हल्ला करून १२६ निरागस विद्यार्थ्यांचे बळी घेतले होते. त्या हल्ल्याबद्दल अलीकडेच तालिबानच्या चार अतिरेक्यांना फासावर लटकविण्यात आले होते. त्याचा सूड घेण्यासाठी हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला व हे हल्ले यापुढेही सुरूच राहतील, असा इशाराही दिला.
हल्ला होताच पेशावरहून मोठी लष्करी कुमक विद्यापीठात दाखल झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. सर्व इस्पितळांमध्ये आणीबाणी जाहीर करून सर्व शाळा-कॉलेजे बंद करण्यात आली. लष्कराच्या कारवाईत चार हल्लेखोर ठार झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. त्याआधी विद्यापीठाच्या आतून गोळीबार करणारे दोन दहशतवादी लष्कराने ठार मारले. हल्ला झाला त्या वेळी विद्यापीठात तीन हजार विद्यार्थी व चर्चासत्राला ६०० पाहुणे उपस्थित होते, असे कुलगुरू डॉ. फजल रहीम यांनी सांगितले. पाकचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या निर्धारापासून सरकार अशा हल्ल्यांमुळे हटणार नाही, असे शरीफ म्हणाले.
या अतिरेकी हल्ल्यानंतर विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थी भेदरलेले असताना अशाही परिस्थितीत तेथील रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक सय्यद हामिद (३४) यांनी अतिरेक्यांशी दोन हात केले. मात्र, विद्यार्थ्यांना वाचविताना अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या नागरिकांनी सोशल मीडियावर प्रोफेसर सय्यद हामिद यांचा शहीद म्हणून उल्लेख करत दु:ख व्यक्त केले.
> मोदींकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करून मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त केली. ‘पाकिस्तानच्या बाचा खान विद्यापीठावरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना, जखमींसाठी प्रार्थना करतो,’ असे टिष्ट्वट मोदींनी केले. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्ल्याचा निषेध केला.
> काश्मिरात दहशतवादी ठार
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर सुरक्षा दलाने जमावाला पांगविण्यास केलेल्या गोळीबारात एक तरुण मृत्युमुखी पडला.

Web Title: Taliban flames again in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.